पुणे : सर्वसमंतीने तीन वर्षांत रिंगरोडचे काम

आयुक्‍त किरण गिते यांचे आश्‍वासन


वडकी येथे रिंगरोडबाबत बैठक

फुरसुंगी- पुणे शहराच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी 110 मिटर रिंगरोड व टीपी स्किमसाठी वडकी येथील शेतकऱ्यांच्या समंतीशिवाय कोणाचाही 7-12 बाधित होणार नाही. कोणाच्याही जमिनी वा जागा घेणार नाही. या प्रकल्पात ज्यांच्या जागा, जमिनी,घरे, व्यावसायिक गोदामे जातात. त्यांना योग्य तो मोबदला देऊन कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही. सर्वांच्या संमतीनेच रिंगरोड व टीपी स्किमचे काम सुरू करुन हे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे ठाम आश्‍वासन पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी दिले आहे.

वडकी येथे नगररचना प्रकल्प (टीपी स्किम) व रिंगरोडसाठीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किरण गित्ते म्हणाले की, या टिपी स्किममुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जमिनधारकांसोबत भागीदारी पध्दतीने नियोजन करून परिसराचा सुनियोजित विकास करुन वाहतूक कोंडी, पाणी व इतर समस्या सोडविता येतील. रिंगरोडभोवती बकालपणा येऊ नये यासाठी टिपी स्किम उभारून सुनियोजित विकास साधला जाईल. 110 मीटरच्या रिंगरोडच्या दोन्ही बाजुला 500 मिटर अंतरापर्यंत वडकी परिसरात सरासरी 500 एकरांच्या दोन टीपी स्किम उभारल्या जातील.

-Ads-

शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या एकूण जागेपैकी 50 टक्‍के विकसित जागा परत देऊन त्या जागेला अडीच एफएसआय दिला जाईल. त्यामुळे शेतकरी वा जागा मालकांचे कोणतेच नुकसान न होता फायदाच होणार आहे. रस्त्यात येणारी घरे व गोदामांना शासकीय नियमांप्रमाणे योग्य तो मोबदला दिला जाईल. उर्वरित 50 टक्‍के जागेत रिंगरोड, टिपी स्किममधील अंतर्गत रस्ते, ओपन स्पेस व इतर पायाभूत सुविधा पुरवून परवडणारी घरे असणारी टिपी स्किम उभारली जाणार आहे, असे गित्ते यांनी सांगितले.

यावर वडकी ग्रामस्थांनी आपल्या शंका उपस्थित करुन अडचणी सांगितल्या. यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी बॅंकांची कर्जे काढून मोठमोठी गोदामे उभारली आहेत. या गोदामांच्या भाड्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. ही गोदामे रस्त्यात गेल्यास ते कुटुंब आर्थिकदृष्टया अडचणीत येणार आहे. यावर काय तोडगा काढणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. त्यावर आयुक्‍त किरण गित्ते म्हणाले, अशा ठिकाणी योग्य तो पर्यायी मार्ग काढला जाईल. ती गोदामे जागेवरच ठेवून काही उपाययोजना केल्या जातील. कोणाचेही नुकसान करुन ही योजना राबविली जाणार नाही, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. ज्यांची अनधिकृत घरे आहेत. गुंठा अर्धा गुंठा जागा वा घरे आहेत. त्यांना विशेष तरतूद करून मार्ग काढला जाईल, असे गिते यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, पांडे, गावच्या सरपंच, उद्योगपती बाळासाहेब साबळे, सतीश केंद्रे, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख संदीप मोडक, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गायकवाड, सुभाष मोडक, दत्ता गायकवाड, सुनील गायकवाड, रामभाऊ मोडक, सचिन गायकवाड व मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)