पुणे: सरकारने बॅंकांप्रमाणे श्रमिकांचेही राष्ट्रीयकरण करावे

भारतीय मजदूर संघाची मागणी, विडी कामगारांचा रोजगार धोक्‍यात

पुणे – विडी कामगारांचा रोजगार धोक्‍यात आल्याने सरकारने बॅंकांप्रमाणे श्रमिकांचेही राष्ट्रीयकरण करून त्यांना काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गुरूवारी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतातील साडेचार कोटी विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यावर विचारमंथन करण्यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे गुरूवारी गंजपेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत “अर्थपूर्ण’ मासिकाचे संपादक आणि कामगार विषयक अभ्यासक यमाजी मालकर, राज्याच्या कामगार विभागाचे अधिकारी एम. ए. मुजावर, महराष्ट्र उद्योग संघाचे प्रतिनिधी शिरीष कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली फडके, भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्ह्याचे सचिव जालिंदर कांबळे, सहाय्यक कामगार आयुक्त सी. बी. जगताप, महापालिकेचे समाजविकास अधिकारी नारायण कोटा, ठाकूर सावदेकर कंपनीचे व्यवस्थापक गायकवाड, विडी कामगार नेते राजाराम येमूल, वासंती तुम्मा, राधाबाई जरबंडी, लता ढगे, लक्ष्मी मंडाल आदी उपस्थित होते.

सरकारी धोरणे आणि कायदे यामुळे विडी उद्योग अत्यंत कठीण अवस्थेतून चालला आहे. याबाबत अखिल भारतीय विडी मजदूर महासंघाचे महामंत्री उमेश विश्वाद यांनी माहिती दिली. तेंदू पत्ता गोळा करणाऱ्यापासून ते विडीची विक्री करणाऱ्यांपर्यंत सुमारे साडेचार कोटी कामगार या उद्योगात काम करतात. विडी कामगारांना पर्यायी शाश्वत आणि क्षमतेनुसार रोजगार मिळाला तरच, ते हा उद्योग सोडण्याला तयार आहेत. या कामगारांची जबाबदारी स्वीकारून सरकारने त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे मत मालकर यांनी यावेळी मांडले. सरकारने त्यांचे उत्पन्न संरक्षित करावे, रोजगाराला संरक्षण देण्याचा कायदा करून या कामगारांना जीवन जगण्यासाठी काम उपलब्ध करून द्यावे, असेही मालकर म्हणाले.

1966 मध्ये विडी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा केल्याने त्यांना अनेक सुविधा मिळत आहेत. त्यांच्यासाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापनाही करण्यात आली आहे. घरासाठी अनुदान, करमणूक, आरोग्य या सुविधांमुळे अल्प उत्पन्न असले तरी, त्यांचे जीवन सुकर झाल्याचे मुजावर यांनी सांगितले. सरकारने पर्यावरणपूरक कामगारांविमुख उद्योगांना संरक्षण द्यावे, अशी मागणी विडी कारखानदारांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. जालिंदर कांबळे, डॉ. फडके यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन सचिन मेंगाळे यांनी केले तर, नरेश पासकंटी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)