पुणे – शिक्षणाधिकाऱ्यांकडून आयुक्‍तांना सहकार्यच मिळेना

शिक्षण आयुक्तांचा शिक्षक भरतीसाठी पुढाकार; अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार

पुणे – राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे मुदतीत शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षण आयुक्‍तांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित सहकार्यच मिळत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे प्रत्यक्षात शिक्षक भरती कधी होणार? असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या 6 महिन्यांपूर्वी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांचे प्रोफाईल अपेडट करण्यासाठी विभागनिहाय मदत कक्षही स्थापन करण्यात आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांना या बिंदूनामावलीची नोंदणी पोर्टलवर करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात 50 टक्‍केच बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्षात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्‍त जागा किती आहेत, याची संख्या निश्‍चित होण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलची सर्व जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्यावर विश्‍वासाने सोपविलेली आहे. त्यानुसार आयुक्‍तांनीही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती व्हावी यासाठी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. विविध प्रक्रियेची माहिती मिळावी यासाठी शिक्षण आयुक्‍तांनी महिन्याभरात 3 वेळा राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यात त्यांनी प्रक्रिया जलद गतीने राबविण्याबाबतच्या सतत सूचनाही दिल्या. मात्र, या सूचनांची शिक्षणाधिकाऱ्यांकडून गांभीर्याने अंमलबजावणीच केली नसल्याचे उघड होऊ लागले आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्‍तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना नुकत्याच पाठविलेल्या पत्राद्वारे स्पष्टपणे नाराजी व्यक्‍त करण्यात आली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अधिकाऱ्यांकडून परिपूर्ण माहितीच सादर केली जात नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे माहितीत विसंगती निर्माण होत असल्याची बाब शिक्षणआयुक्‍तांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची येत्या 1 व 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष विशेष आढावा बैठक घेण्याचे नियोजन शिक्षण आयुक्‍तांकडून करण्यात आलेले आहे. या बैठकीत आयुक्‍तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडतीच घेतली जाणार असल्याची शक्‍यता अधिक आहे. विशेष आढावा बैठक झाल्यानंतर भरती प्रक्रियेबाबात वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)