पुणे: शहरातील सांडपाण्यावर शंभर टक्‍के प्रक्रिया करावी

पुणे – “नमामि चंद्रभागा’ हे अभियान राज्य शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या अभियानांतर्गत सन 2022 पर्यंत चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करायची आहे. “नमामि चंद्रभागा’ अभियानांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात असणाऱ्या सर्व औद्योगिक कारखाने आणि साखर कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया होते का? हे पाहण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून नियमित तपासणी करून घ्यावी. भीमा तथा चंद्रभागा नदी व तिच्या उपनद्यांच्या काठी असणारी गावे आणि शहरांतील सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात “नमामि चंद्रभागा’ सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली “नमामि चंद्रभागा’ प्राधिकरण-प्रकल्प संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, वनसंरक्षक रंगनाथ नायकवडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, नगर विकास विभागाचे विवेक खांडेकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, कृषि अधीक्षक विनयकुमार आवटे, जिल्हा कृषि अधिक्षक बी. जी. पलघडमल, स्वयंसेवी संस्थेचे निमंत्रित सदस्य सुनिल जोशी, जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या शक्ति प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला, या बैठकीत झालेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात झालेल्या अप्पर मुख्य सचिवांच्या बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व विभागांना दिल्या.

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी “निरी’ या संस्थेशी तातडीने करार करून घेण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. “नमामि चंद्रभागा’ अभियानांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात असणाऱ्या सर्व औद्योगिक कारखाने आणि साखर कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया होते का? हे पाहण्यासाठी निरी किंवा त्रयस्थ संस्थेकडून नियमित तपासणी करून घ्यावी. भीमा तथा चंद्रभागा नदी व तिच्या उपनद्यांच्या काठी असणारी गावे आणि शहरांतील सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात यावी. तसेच भीमा नदी व तिच्या उपनद्यांच्या काठी असणाऱ्या शासकीय अथवा वनविभागांच्या जमिनींवर फळझाडांची लागवड करण्यात यावी, तसेच नदी काठी असणाऱ्या खाजगी क्षेत्रावर अधिकाधिक फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)