पुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर

20 ऑक्‍टोबरला भूमिपूजन : 358 कोटींचे काम सुरू होणार 

पुणे- लोहगाव विमानतळाच्या आवारात नवीन इमारत उभारण्यात येणार असून, यामध्ये अधिकाधिक सोयी पुरवण्यात येणार आहे. तब्बल 42 हजार चौ. मी.वर ही इमारत उभी राहणार आहे. यासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 358 कोटी रुपयांच्या कामांचा आरंभ 20 ऑक्‍टोबरपासून होणार आहे. विमानतळ प्रशासनाचे संचालक अजयकुमार यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

-Ads-

लोहगाव विमानतळावरून 2013-14 मध्ये 35 लाख 96 हजार 684 प्रवाशांची जा-ये होती. 2017-18 मध्ये ही संख्या 81 लाखांवर गेली त्यातून विमानाच्या फेऱ्याही वाढल्या. पूर्वी वर्षाला 30 हजार फेऱ्या होत होत्या. त्या आता 57 हजार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मुलभूत सोयीसुविधांमध्येही वाढ होणे आवश्‍यक असल्याने नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात 1 कोटी प्रवाशांची वाहतूक या विमानतळावरून होऊ शकणार आहे, असे अजयकुमार यांनी सांगितले.

विमानतळप्रशासनाकडे याआधी 26 एकर जागा होती. त्यानंतर 2018 मध्ये 16 एकर जागा वाढवून मिळाली आहे. कार्गो पार्किंग, कार्यालयीन व्यवस्था आणि निवासी संकुलासाठी आणखी 35 एकर जागेसाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. सध्या कार्गो आणि विमान कंपन्यांच्या विमानांसाठी 10 एकर जागेचा वापर होणार आहे. वाढत्या मालवाहतुकीसठी स्वतंत्र कार्गो टर्मिनलची व्यवस्था केली जाणार आहे. सीआयएसएफ, विमानतळाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था येथे होणार आहे. नवी इमारत 42 हजार चौ. मी. होणार असून, त्यात 750 प्रवाशांची बसण्याची सोय होणार आहे. पाच नवे एअरोब्रिज, आठ सरकते जिने, 15 लिफ्ट, बहुमजली कार पार्किंग, परवडणाऱ्या दरातील उपहारगृहे उभारली जाणार आहेत.

रेंगाळणाऱ्या टॅक्‍सींना पार्किंग शुल्क?
विमानाने पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांना नेण्यासाठी अनेक खासगी टॅक्‍सी विमानतळावर येतात आणि यापैकी अनेक टॅक्‍सी विमानतळ परिसरात रेंगाळतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे अशा टॅक्‍सींना पार्किंग शुल्क आकारावे, असा विचार सुरू आहे. या संदर्भात देशपातळीवर धोरण निश्‍चित करण्यात येत असून, ते देशभरात लागू होईल, असे अजय कुमार यांनी सांगितले. सध्या विमानतळावर येण्यासाठी आणि जाण्यासाठी पीएमपी सेवा उपलब्ध असून त्यासाठी मोफत पार्किंग देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्याबरोबरच रिक्षा, बस आणि टॅक्‍सीसाठी स्टॅंड हवे आहेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एप्रिलपासून बॅंकॉक सेवा
एप्रिलपासून पुण्यातून बॅंकॉकसह अन्य काही ठिकाणी सेवा सुरू होत आहे. सध्या पुणे विमानतळावरून दररोज दोनशे विमाने ये-जा करतात. पैकी तीन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. यामध्ये सर्व भारतीय कंपन्यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. मात्र, पुणे विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा नसल्यामुळे येथे परदेशी विमान कंपन्यांची उड्डाणे होत नाहीत. त्यासाठी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी अजय कुमार यांनी केली.

वार्षिक प्रवासी संख्या
2013-14 -35 लाख
2017- 18 -81 लाख
2020 पर्यंत – एक कोटी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)