पुणे विभागात रेल्वेचा मोठा अपघात घडवण्याचा कट

पुणे,दि.18
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मागील दोन महिन्यांपासून घातपात घडवण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून सुरू आहेत.रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून 8 ते 10 वेळा अपघात घडवण्याचे प्रयत्न केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दरम्यान काही वेळा रेल्वेचे इंजिनदेखील रुळांवरुन घसरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकारांमुळे अपघात घडण्याची शक्‍यता निर्माण होऊन रेल्वे प्रवाशांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. या व्यक्तींवर कारवाईसाठी रेल्वे पोलीस व प्रशासन प्रयत्न करत आहेत.
मध्य रेल्वेचा पुणे विभाग 600 किलोमीटरचा आहे. या विभागात मागील दोन महिन्यांत अनेक वेळा रेल्वे रुळांच्या क्रॉसिंग दरम्यान लोखंडी वस्तू आढळून आल्या आहेत. रेल्वेचा अपघात व्हावा यासाठी क्रॉसिंगदरम्यान या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडी आणि हातकणंगले स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांमध्ये लोखंडाचा दांडा काही दिवसांपूर्वीच आढळून आला होता. रेल्वे अधिकारी आणि लोको पायलट्‌सच्या सतर्कतेमुळे अद्याप कोणताही अनर्थ घडलेला नाही. कोल्हापूरसोबतच तळेगाव-कामशेत विभागातही रेल्वे रुळांमध्ये लोखंडी दांडा ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेसच्या लोको पायलटनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला आहे.त्याचप्रमाणे सातारा जिल्हयातील वाठारमध्ये काही मुलांनी रेल्वे अपघातासाठी रेल्वे रुळांवर लोखंडी प्लेट ठेवली होती. त्या रेल्वे पोलीसांनी संबंधित मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्या पालकांच्या चौकशीनंतर त्यांना सोडुन देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

“” गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रेल्वे रूळावर लोखंडी वस्तू आढळून येत होत्या. सुरवातीला लहान मुलांनी खेळता खेळता ठेवल्या असतील असे वाटून रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सातत्याने याच घटना घडू लागल्याने प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. अशाप्रकारच्य घटना या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे जिवित अथवा वित्तहानी होण्याची शक्‍यता निर्माण होते. त्यामुळेच लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण झाली पाहिजे. तसेच मुद्दमहून असे काम करणाऱ्या लोकांबाबत नागरिकांनी सावध होऊन त्यांची माहिती रेल्वे अधिकारी अथवा पोलिसांना द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.”
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)