पुणे विद्यापीठात बोलत्या झाडांची किमया साकारणार

6 हजारहून अधिक भाषा बोलणारे जागतिक भाषा उद्यान होणार

पहिल्यांदाच भारतात होत आहे पेन इंटरनॅशनलचे वार्षिक अधिवेशन

पुणे – जगभरातील 6 हजारहून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषा बोलणारी बोलकी झाडे विद्यापीठात येत्या काळात पहावयास मिळणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या पेन आंतरराष्ट्रीय अधिवेशन या जागतिक स्तरावरील साहित्यांच्या संमेलनादरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जगभरातील लेखक, संपादक, साहित्यिक यांची प्रतिष्ठित संघटना असलेल्या पेन इंटरनॅशनलचे वार्षिक अधिवेशन पेन इंटरनॅशनल कॉंगेस हे या वर्षी पहिल्यांदाच भारतात भरणार आहे. हे अधिवेशन भरवण्याची संधी पुण्याला मिळाली असून, 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये ते होणार आहे. पेन इंटरनॅशनल कॉंगेससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे इंटेलेक्‍च्युअल पार्टनर असणार आहे. या निमित्ताने पुणे विद्यापीठात भाषावनाची निर्मिती करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषातज्ज्ञ आणि या परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. गणेश देवी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या परिसरातील जागेत 180 झाडे या साहित्यिकांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने या झाडांमध्ये विविध प्रकारची 6 हजार भाषांमधील गाणी, कथा, कविता, साहित्य, म्हणी आदी ऐकता येणार आहेत. 28 सप्टेंबरला हा प्रकल्प सुरू होऊन 30 जानेवारीपर्यंत हा अस्तित्वात आलेला असेल, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

पेनची स्थापना 1921 मध्ये लंडन येथे झाली. ही संघटना मुख्यत: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांतता आणि मित्रत्व या मूल्यांसाठी कार्यरत असते. शंभराहून अधिक देशांमधील लेखक-साहित्यिक या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेचे अधिवेशन यापूर्वी कधीही भारतात झालेले नाही. महात्मा गांधी यांच्या जन्माचे 150 वे वर्ष ऑक्‍टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात साजरे केले जाणार आहे. याचे औचित्य साधून या परिषदेच्या अधिवेशनाचे यजमानपद या वर्षी भारताला मिळाले आहे. ही 84 वी पेन इंटरनॅशनल कॉंग्रेस आहे. या अधिवेशनादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रामुख्याने सहभागी असणार आहे. तसेच, पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. यानिमित्त प्रामुख्याने 3 कार्यक्रम होणार आहेत. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात भाषावन साकारण्यात येणार आहे. जगातील तसेच भारतातील साहित्यिकांचा आणि विविध 25 महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये संवादाचा कार्यक्रम होणार आहेत. त्यातून साहित्य व भाषाविषयक देवाण-घेवाण अपेक्षित आहे. यानिमित्त जगातील हजारो भाषांचे प्रतिनिधित्व असलेली भाषादिंडी निघणार आहे. या उपक्रमांच्या नियोजनासाठी स्थानिक स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून, तिचे अध्यक्ष सचिन इटकर असतील, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

शंभर पुस्तकांचा अनुवाद
जगभरातील विविध भाषांमधील प्रसिद्ध 100 पुस्तकांचा भारतीय भाषांमध्ये तर, भारतातील प्रसिद्ध 100 पुस्तकांचा जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्याबाबत परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर पुस्तकांची निवड करण्यात येऊन अनुवाद करण्यात येईल, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

6 हजार भाषांची दिंडी
परिषदेमध्ये सुमारे 6 हजार भाषांची दिंडी काढली जाणार आहे. या दिंडीचे नेतृत्व मराठी भाषा करणार आहे. ही अनोखी दिंडी दि. 28 सप्टेंबरला दुपारी 2 ते 5 या वेळेत निघेल. सर्व लेखक, भाषातज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे नेहरू सांस्कृतिक भवन येथे भारतीय कलांचे प्रदर्शन, विद्यापीठ व आगाखान पॅलेस येथे नाटके, भारतीय भाषांवर चर्चासत्र, आगाखान पॅलेस येथे भेट, केनिया येथील एन. गुगी यांच्यासह कवी अशोक वाजपेयी तसेच काही निवडक प्रसिद्ध लेखकांची व्याख्याने, परदेशी तसेच भारतीय कवींचे एकत्रित कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम परिषदेत होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)