पुणे – विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘अॅथलेटिक ट्रॅक’

काम पूर्णत्वास : तीन महिन्यांत विद्यार्थ्यांसाठी होणार खुला

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा “अॅथलेटिक ट्रॅक’ सरावासाठी उपलब्ध होणार आहे. या ट्रॅकचा दर्जा “श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल’मध्ये उभारण्यात आलेल्या अॅथलेटिक ट्रॅकपेक्षा चांगला असणार आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले असून फुटबॉल ग्राऊंडचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत हा ट्रॅक विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत पुणे विद्यापीठातील खेळाडूंची चांगली कामगिरी राहिली आहे. अनेक होतकरू खेळाडूंसाठी सराव करण्याची हक्‍काची सोय आता विद्यापीठात होणार आहे. सध्या विद्यापीठाच्या मैदानावर या “अॅथलेटिक ट्रॅक’चे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चारशे मीटर लांबीच्या या “सिंथेटिक ट्रॅक’वर अॅथलिट प्रकारातील सर्व खेळ खेळण्याची सोय आहे. तसेच, या ट्रॅकच्या मध्यभागी फूटबॉल ग्राऊंडदेखील उभे राहणार आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. बाजूला सुमारे एक हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय आणि खेळाडू व त्यांचे प्रशिक्षकांसाठी खोल्या तयार केल्या जाणार आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धाही या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठाकडून विविध खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सोय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. बॅडमिंटन हॉल, दहा मीटर एअर रायफल शूटिंग रेंज अशा अनेक सुविधा लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत. विद्यापीठातील खेळाडूंची उत्तम कामगिरी लक्षात घेऊन भविष्यात त्यांना सोयीसुविधा देण्याचे काम विद्यापीठाकडून सुरू आहे. लवकरच इतरही खेळांसाठी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची सोय करून देण्यात येईल. विद्यापीठासोबतच इतर कॉलेजांमधील विद्यार्थीही त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

विद्यापीठाच्या अॅथलेटिक ट्रॅकसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या ट्रॅकचे काम पूर्णत्वास आले आहेत. यातील फूटबॉलचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर जागतिक दर्जाचे अॅथलेटिक ट्रॅक विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
– आर. व्ही. पाटील, स्थावर विभागप्रुख, पुणे विद्यापीठ

अॅथलेटिक ट्रॅक सर्वोत्तम
बालेवाडी संकुलासाठी काम केलेले भारतातील प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू हेच विद्यापीठातील क्रीडा संकुलासाठी काम करीत आहेत. येथील अॅथलेटिक ट्रॅकपेक्षा विद्यापीठातील ट्रॅकचा दर्जा सर्वोत्तम राहणार आहे. या ट्रॅकमुळे विद्यापीठातून आता अनेक खेळाडू घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)