पुणे विद्यापीठातील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेशपरीक्षा ऑनलाईनद्वारे होणार आहे. विद्यापीठ आवारातील विविध अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश अर्ज व प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

विद्यापीठातील विभागांमध्ये असलेल्या विविध पदव्युत्तर, पदवी, एकात्मिक, आंतरविद्याशाखीय तसेच पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रवेश परीक्षेची माहिती https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

विद्यापीठातील पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश मात्र संबंधित विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन प्रवेश परीक्षेद्वारे देण्यात येतील. प्रवेशांमध्ये तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र ऑनलाईनद्वारे होतील, अशी माहिती शैक्षणिक प्रवेश विभागाकडून देण्यात आली.

विद्यापीठ परिसरातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये मिळून 80 पेक्षा जास्त पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम चालविते जातात. त्याखेरीज विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मिळून सुमारे 70 पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. संबंधित विभागांमध्ये होणाऱ्या परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जातील. अभ्यासक्रमनिहाय ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखा, त्याची अंतिम मुदत आणि प्रवेश परीक्षेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तसेच देशातील काही प्रमुख महानगरांमध्ये घेतली जाईल. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचा विस्तार तर होईलच, शिवाय विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जवळच्या वा सोयीच्या शहरामध्ये परीक्षा देणे शक्‍य होईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्ज दाखल करण्यापासून ते अभ्यासक्रम व वसतिगृहामध्ये प्रवेश मिळण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे सुसुत्रीकरण होणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)