पुणे : विद्यापीठाचा हिंदी विभाग देणार प्रत्येकाला रोजगार

अभ्यासक्रमात कालानुरूप बदल


विभाग प्रमुख डॉ. भोसले यांची माहिती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांचे अभ्यासक्रम रोजगारभिमुख करण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंदी विभागाने पदव्युत्तर अभ्यासक्रमात कालानुरूप बदल केले असून, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात आणि त्यांच्यासाठी आर्थिक प्रगतीची विविध क्षेत्रे खुली व्हावीत, यावर भर देण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन वर्षांत प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळेल, या दृष्टीने विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

विद्यापीठाचे अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना भाषिक ज्ञान सखोलपणे मिळावे याचा अभ्यास करून कायम केले गेले आहेत. महाराष्ट्रात हिंदी भाषेत प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. फक्त त्या संधींपर्यंत पोहोचण्यासाठी त्या संधींचा शोध घेण्याची पद्धती आणि त्याविषयी तयारी उत्तम असणे गरजेचे आहे. याविषयी अधिक माहिती घेऊन काही उपक्रम नव्याने गेली काही वर्ष करीत आहोत, अशी माहिती विद्यापीठाच्या हिंदी भाषा विभाग प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी दिली.

विद्यार्थी एम.ए. करतानाच संशोधन आणि प्रवेश परीक्षेच्या तयारीशी निगडीत एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. भविष्यातील आव्हाने आणि संधी यांच्यासाठी हिंदी विभागातील विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, यासाठी सर्वतोपरी तयारी करून घेण्यात येत आहे. भाषांतर हे विस्तृत क्षेत्र आहे. हिंदी भाषा विभागातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातून भरीव रोजगार उपलब्ध आहे. त्यादृष्टीने विभागाने पाऊल उचलले आहे.

भाषा प्रयोगशाळा सुरू होणार
रेडिओ, टेलीव्हीजन, व्हॉइस कल्चर, वृत्तपत्र व नियतकालिक लेखन, नाटक व चित्रपट संहिता लेखन, ग्रंथ निर्मितीसाठी लेखन व अनुवाद याविषयी चार शैक्षणिक सत्रांमध्ये प्रत्येकी एक यानुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण अभ्यासक्रमांसहित देण्याची व्यवस्था हिंदी विभागात करण्यात आली आहे. हिंदी विभागात भाषा प्रयोगशाळा स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यात आल्याचे भोसले यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)