पुणे – लिली, मोगरा, गुलछडी फुलांची आवक

मागणीअभावी फुलांच्या भावात घसरण : उन्हाचा फूल उत्पादनावर परिणाम

पुणे – जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर होत आहे. दरम्यान, मुबलक पाण्यावर जगविलेली फुलझाडे त्यातच फुलांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने बाजारात लिली, मोगरा, गुलछडी आदी फुलांची आवक वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत मागणी नसल्याने भावात घसरण झाली आहे.

मार्केट यार्डातील फुलबाजारात यवत, सुपा, सोरतापवाडी भागातून लिली, आळंदी तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून मोगरा आणि सोरतापवाडी, यवत परिसरातून गुलछडी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. सध्याचे वातावरण हे लिली, मोगरा आणि गुलछडी आदी फुलांसाठी पोषक असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुले बाजारात दाखल होत आहे. मात्र, त्याप्रमाणात फुलांना मागणी नसल्याचे चित्र बाजारात आहे. फुलबाजारात लिलीच्या एका बंडलची 2 ते 3 रुपये, मोगरा 60 ते 130 व गुलछडीची 16 ते 25 रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. दुष्काळातही मोठ्या कष्टाने फुलविलेल्या फुलांना भाव नसल्याने शेतकऱ्यांमधे नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

याबाबत बोलताना फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिली, मोगरा, गुलछडीची आवक वाढली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाल्याने चांगली आवक होत आहे. ढगाळ वातावरणातही या फुलांच्या उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांनी मुबलक पाण्यावर नियोजन करून पिके घेतल्याने दुष्काळातही मोठ्या प्रमाणात फुले बाजारात येत आहे. पांढरी फुले ही सर्वसाधारण मुस्लिम समाजात लग्नकार्यात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र, सध्या रमजानचे उपवास सुरू असल्याने लग्नतारखा नाही. त्याचा परिणाम फुलांच्या मागणीवर झाला आहे.

फुलांचा दर्जा ढासळला
राज्यात उष्णतेची लाट असल्यामुळे मोगरा वगळता इतर फुलांचा दर्जा काही प्रमाणात ढासळला आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)