पुणे रेल्वे स्थानकाची देखभाल खाजगी कंपनीकडे

रेल्वे संचलन, तिकीट सोडून फ्लॅटफॉर्मची कामे, स्वच्छतागृह, कॅन्टीन, परिसरातील स्वच्छता कामांसाठी मदत

पुणे – रेल्वे मंत्रालयाच्या योजनेंतर्गत पुणे रेल्वे स्टेशनच्या विकासाचे काम लवकरच सुरू होणार असून याची जबाबदारी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनवर (आयआरएसडीसी) सोपवण्यात आली आहे. मात्र, पुणे स्थानकाबाबतीत संस्थेने खासगी कंपनीची मदत घेतली असून या कंपनीकडून स्थानक परिसराची देखभाल केली जाणार आहे. यात रेल्वे संचलन आणि तिकीट सोडून सर्व कामे ही कंपनी करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विभागीय रेल्वे मंडळाने रेल्वेच्या कामांची माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, देशभरातील काही रेल्वे स्थानकांची देखभाल करून ती चकाचक करण्याची रेल्वेची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. यात देशातील महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश असून टप्प्याटप्प्याने स्थानकाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे स्टेशनच्या विकासास सुरुवात होणार आहे. पुणे स्टेशनवरील फ्लॅटफॉर्मची कामे, स्वच्छतागृह, कॅन्टीन, परिसरातील स्वच्छतेसह सर्व कामे संबंधित कंपनीकडून करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांना हे काम देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, कंपनीवर विकासाची जबाबदारी असली तरी रेल्वे संचलन आणि तिकीट यांमध्ये कंपनीचा हस्तक्षेप नसेल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्लॅटफॉर्म तिकीट, पार्किंग शुल्काबाबतचे अधिकार कंपनीला असणार आहेत. खासगी कंपनीकडून हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकलखाली 143 मृत्यू
पुणे-लोणावळा मार्गावर धावत्या लोकल खाली गेल्या वर्षभरात 143 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अनधिकृतपणे रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या प्रवाशांचा यात सर्वाधिक समावेश आहे. अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या 46 एवढी असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)