पुणे: रेल्वे प्रशासनाकडून होणार प्लॅस्टिक बंदीची कडक अंमलबजावणी

पुणे – राज्यभरात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीची पुणे स्थानकासह विभागातील अन्य स्थानकांवर देखील कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमिवर रेल्वे स्थानकावर केटरिंग सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारासह खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्लॅस्टिक ऐवजी पर्यायी वस्तूचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रसासनाकडून देण्यात आली.

राज्यभरात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून त्यानुसार प्लॅस्टिकचे कप, चमचे, डिश, बाऊल, स्ट्रॉ, पार्सलसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक आदींच्या उत्पादनास, वापरास, वाहतुकीस तसेच विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. रेल्वेतील खानपान सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होतो. मात्र, प्लॅस्टिकबंदीमुळे यावर बंदी आल्याने त्यावर पर्यायी वस्तूंचा वापर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानकावर रोज मोठ्या प्रमाणात गोळा होणारे प्लॅस्टिक बंद होणार आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनही प्लॅस्टिकचा वापर होत असतो. प्लॅस्टिकबंदीमुळे त्यावर देखील बंदी आली असून नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. लायसन्सधारक विक्रेते व केटरिंग सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंत्राटदारांकडे प्लॅस्टिक आढळल्यास किंवा त्यांनी कोणत्याही पद्धतीने प्लॅस्टिक वापरासाठी प्रोत्साहन दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे मध्य रेल्वेने स्वागत केले असून प्रवाशांनी या नियमाचे पालन करून रेल्वेला पर्यावरणपूरक बनविण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)