पुणे: रिंगरोडवर व्यावसायिक वाहनांसाठी टोल

वापरऐवढेच शुल्क, सर्व्हिस लेनसाठी टोल नाही

पुणे – “पीएमआरडीए’ने हैदराबाद रिंगरोडच्या धर्तीवर “वापर तेवढाच टोल’ या पद्धतीने टोल आकारणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, हा टोल फक्त व्यावसायिक वाहनांसाठी असणार आहे. तसेच सर्व्हिस लेनसाठी टोल आकारण्यात येणार नाही.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी “पीएमआरडीए’ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. 128 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड असणार आहे. यापूर्वी हा रिंगरोड टोल फ्री करण्याचा विचार पीएमआरडीएकडून करण्यात आला होता. परंतु प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा या रिंगरोडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा खर्च विचारात घेऊन”पीएमआरडीए’ने त्यावर टोल आकारण्याची करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु देशभरातील अन्य महामार्गावर आकारल्या जाणाऱ्या सरसकट टोल ऐवजी “वापर तेवढाच टोल’ या पद्धतीने त्यांची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात अशा प्रकारे पहिला प्रयोग हैदराबाद येथील रिंगरोड करण्यात आला आहे. तेथील रिंगरोडवर 17 ठिकाणी एक्‍झिट पॉइंट उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर “पीएमआरडीए’च्या रिंगरोडवर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. रिंगरोडवर ज्या ठिकाणी वाहन चालक प्रवेश करेल त्या ठिकाणी त्यांना एक रिसीट देऊन एन्ट्रीची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणाहून वाहनचालक रिंगरोडवरून बाहेर पडणार असेल, त्या ठिकाणी तुम्ही किती किलोमीटर रिंगरोडचा वापर केला, कुठे एन्ट्री केली आणि कोठून बाहेर पडलात, टोलची रक्कम किती झाली, हे तत्काळ वाहन चालकांना कळणार आहे. तेवढाच टोल वाहन चालकांना भरावा लागणार आहे. त्यासाठी रिंगरोडवर वीस ठिकाणाहून अधिक ठिकाणी एक्‍झिट पॉइंट ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)