मुख्यमंत्र्यांचा आयुक्त, महापौरांना अल्टीमेटम
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वरदान ठरू शकणाऱ्या सुमारे 36 कि.मी.च्या “हाय कपॅसिटी मास ट्रान्झीट रुट’ (एचसीएमटीआर) रस्त्याचे काम 1 जूनच्या आधी कोणत्याही स्थितीत करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांना दिल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्यांच्या प्रक्रिया या तारखेच्या पूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, स्मार्ट सिटी तसेच मेट्रोच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून त्यावर प्रभावी उपाययोजना ठरणाऱ्या “एचसीएमटीआर’ रस्त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पालिकेकडून पुढील दहा दिवसांत “एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट’ही काढण्यात येणार आहे. हा रस्ता शहराची भविष्यातील गरज असून त्यासाठी राज्य शासन महापालिकेस सर्व मदत करण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र, पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याने, मी महापालिकेस आणखी काही महिन्यांची मुदत देऊन 1 जून रोजी या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू करावे, अशी जबाबदारी आयुक्त राव तसेच महापौरांवर आज देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
घोषणेची करून दिली आठवण
हा कार्यक्रम संपल्यानंतर आयुक्त तसेच महापौरांनी मुख्यमंत्र्यांची व्यासपीठावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महापौर तसेच आयुक्तांना दिलेल्या वेळेत काम मार्गी लावण्याची आता तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ती मार्गी लावाल असा विश्वास असल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी कालब्ध कार्यक्रम आखावा, अशा सूचना देत आपण केलेल्या घोषणेची आठवण करून दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा