पुणे: “राष्ट्रीय स्वच्छ हवा आराखडा’ कुचकामी

सुधारणा होण्याची गरज : पर्यावरणप्रेमी संस्थांनी नोंदविल्या हरकती

पुणे – केंद्रसरकारने जाहीर केलेला “राष्ट्रीय स्वच्छ हवा आराखडा’ म्हणजे “बडा घर, पोकळ वासा’ अशा स्वरूपाचे आहे. यामध्ये प्रदूषण रोखण्याबाबत कोणतेही ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. यामध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदविल्या आहेत. याचा मसुदा तयार करून तो केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. आराखड्यामध्ये शहरी भागांवर जास्त भर देण्यात आला आहे. प्रादेशिक स्तरावर कोणतेही धोरण राबविण्याचे नमूद केले नाही. एकूणच हा आराखडा सर्वसमावेशक नसल्याचे या हरकतींमध्ये म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वायूप्रदूषणाबाबत “राष्ट्रीय स्वच्छ हवा आराखडा’ जाहीर केला आहे. याबाबत हरकती नोंदविण्यासाठी गुरूवारपर्यंत (दि.17) मुदत होती. याच अनुषंगाने शहरातील परिसर आणि लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट ऍण्ड एन्व्हायर्नमेंट (लीफ) या संस्थातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदविला.

सरकारने विकासाबाबत एका योग्य दिशेची निवड केली पाहिजे. एकीकडे सरकार विकासाबाबत भाष्य करते, दुसरीकडे पर्यावरणाच्या विपरित धोरणांचा अवलंब केला जात आहे. सध्या रस्ते, फ्लायओव्हर यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यासाठी वृक्षतोडही जास्त होते. पण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र कोलमडलेलीच आहे. मग पर्यावरणाचा समतोल साधणार कसा?
– सुजीत पटवर्धन, संस्थापक सदस्य, परिसर संस्था.

राज्यातील सर्वच शहरात वायूप्रदूषणाचे प्रमाण राष्ट्रीय आणि जागतिक संस्थांनी ठरविलेल्या निकषांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे अजूनही गांभिर्याने पाहिले जात नाही. तसेच ऊर्जा, वाहने यांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवाश्‍म इंधनाचे प्रमाणही जास्त असल्याने, प्रदूषणात भर पडत आहे. यासाठी अजून आक्रमक अशा धोरणांची गरज आहे.
– सुनील दहिया, ग्रीनपीस संस्था.

आराखड्यामध्ये केवळ शहरी भागांवर भर देण्यात आला आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी औद्योगिक परिसर हा शहराबाहेर असतो. मात्र, या आराखड्यामध्ये अशा प्रदेशांबाबत कोणतेही धोरण नाही. म्हणूनच केवळ शहरी भागांपेक्षा प्रादेशिक भागांवर भर देत हा आराखडयाची पुनर्रचना व्हावी.
– रित्विक दत्ता, लीफ संस्था.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)