पुणे – रसाळ, गोड जांभळांनी तोंडाला पाणी

कोकणातून आवक सुरू : भाव आवाक्‍यात येण्याची शक्‍यता

पुणे – रसाळ आणि गोड चवीच्या जांभळाची कोकणातून मार्केट यार्डात आवक सुरू झाली आहे. विशेषत: सावंतवाडी, कणकवली या भागातून ही आवक होत असून, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आठ ते दहा दिवस अगोदरच ही आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोस 150 ते 170 रुपये भाव मिळाला. पुढील आठवड्यापासून जांभळाची सुरळीत आवक सुरू होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

दरवर्षी कर्नाटक, गुजरात आणि स्थानिक भागातून जांभळाची आवक होत असते. मागील दोन-तीन वर्षांपासून स्थानिक जांभळाच्या तुलनेत गुजरात येथून जांभळाची महिनाभर आधीच होत असते. यंदाही सुमारे दीड महिना अगोदरच झाली. त्यापाठोपाठ आता मंगळवारी कोकणातून 60 ते 80 किलो जांभळांची आवक झाली. ही आवक मार्केटयार्डातील प्रकाश निवृत्तीनाथ घुले आणि शिवाजी भोसले यांच्या गाळ्यावर झाली.

व्यापारी अजित घुले म्हणाले, “कोकण भागातील जांभळाचा हंगाम एप्रिल ते जूनपर्यंत सुरू असतो. सध्या बाजारात दाखल होणाऱ्या जांभळाचे प्रमाण कमी असले, तरी पुढील आठवड्यापासून जांभळाची आवक सुरळीत सुरू होईल. कोकणतील जांभळाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे या जांभळाला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. मधुमेहासाठी जांभुळ उपयोगी ठरत असल्याने मागील काही वर्षांपासून त्यास मागणी वाढली आहे. पुढील काही दिवसांनंतर कर्नाटकसह बांदा, बारामती, मुळशी भागातून जांभळाची आवक सुरू होईल. आवक वाढल्यानंतर जांभळाचे भाव आवाक्‍यात येतील.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)