पुणे : रखडलेल्या शिवसृष्टीवरून मुख्यसभेत आंदोलन

पुणे – कोथरुड येथील शिवसृष्टी चांदणी चौकातील जैवविविधता उद्यानात (बीडीपी) उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री केली; मात्र गेल्या तीन महिन्यांत कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत महापालिकेतील विरोध पक्षांनी मुख्यसभेत सोमवारी आंदोलन केले. विशेष म्हणजे, विरोधकांनी डोक्‍यावर भगवे फेटे घालून शिवसृष्टीबाबत सत्ताधारी भाजपला जाब विचारला.

चांदणी चौकातील 100 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. तसेच, येथील “बीडीपी’बाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. तेव्हा भाजपच्या सदस्यांनी महापालिकेत आनंदोत्सव साजरा केला होता. या पार्श्‍वभूमीवर शिवसृष्टी उभारण्याबाबत कार्यवाही होत नसल्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी मुख्यसभेत आंदोलन केले. शिवसृष्टी मार्गी लावल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणेकरांची फसवणूक केली आहे.

सरकार केवळ आश्‍वासने देत आहे. प्रत्यक्षात मात्र, शिवसृष्टी आणि “बीडीपी’ धोरणाबाबत कार्यवाही केलेली नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सभागृहात सांगितले. चांदणी चौकातील सर्वे क्रमांक (99,100) येथील जागा मालकांना चर्चेला बोलविले होते. ही जागा ताब्यात घेताना त्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याबाबत चर्चा सुरू आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सभागृहात सांगितले.

एलईडी दिवे नादुरुस्त
शहरात “एलईडी’ दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, अनेक रस्त्यांवरील दिव्यांमध्ये बिघाड झाल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. अनेक भागात अजून दिवे लावण्यात आलेले नाहीत. ज्या ठिकाणी लावले आहेत, त्याची दूरवस्था झाली आहे. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी तक्रारही त्यांनी केली. शहरात आतापर्यंत सव्वालाख दिवे बसविले आहेत. ज्या भागात दिवे खराब झाले आहेत, त्यांची पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)