पुणे : येरवड्यात डॉक्‍टरअभावी गर्भवतीचा अर्भकासह मृत्यू

येरवडा- पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्‍टरच नसल्यामुळे बाळंतपणासाठी ससून रूग्णालयात हलविण्यात आलेल्या गर्भवतीसह अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना गुरूवारी रात्री घडली.

शुभांगी राजाराम जानकर (वय 20, रा. भैरवनगर, धानोरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जानकर कुटुंब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी जानकर यांना बाळंतपणासाठी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात गुरूवार दि. 22 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा रक्‍तदाब वाढल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात उपचारासाठी डॉक्‍टरच हजर नव्हते.

राजीव गांधी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविले. त्यांना रात्री साडेआठ वाजता ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 23 येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री साडेनऊ वाजता गर्भवतीसह अर्भकासह मृत्यू झाला. शुभांगी यांचा मृतदेह विच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या मूळगावी रत्नागिरी खेड येथे अंत्यविधीसाठी नेला आहे. याप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल ससून रुग्णालयाने राखून ठेवला असून विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे येरवडा येथील रुग्णालय असून अपुऱ्या सोयी सुविधा व इतर अन्य कारणांमुळे हे रुग्णालय कायमच चर्चेत असते.

याच रुग्णालयात काही वर्षांपूर्वी बाळंतपणासाठी आलेल्या विवाहितेचा मृत्यू झाला होता. पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील उपचाराविना गर्भवतीचा मृत्यू झाल्याने परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. उपचारासाठी डॉक्‍टर उपलब्ध नसणे तसेच आवश्‍यक उपचार न मिळाल्यामुळे शुभांगी यांचा मृत्यू झाला आहे. जानकर कुटुंब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असून ते काही वर्षांपासून कामानिमित्त धानोरी परिसरात स्थायिक झाले आहे. शुभांगी यांचे पती राजाराम जानकर मजुरी करतात.
याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रविकिरण दरोडे करीत आहेत. याप्रकरणी जबाबदार दोषी डॉक्‍टर व संबंधितांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)