पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) म्हाळुंगे- माण येथे टीपी स्कीम योजना आखली आहे. त्यासाठीचा प्रारूप आराखडा प्रसिध्द करण्यात आला आहे. हा आराखडा संबधित ग्रामस्थांना मान्य नसून गावकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे लेखी हरकती नोंदविल्या आहेत. याची दखल प्राधिकरणाने न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा म्हाळुंगे ग्रामस्थांनी दिला.

या टीपी स्कीमबद्दल ग्रामस्थांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ग्रामस्थ बोलत होते. हिंजवडी मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी म्हाळुंगे -माण रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हिंजवडी एमआयडीसी कडे जाणाऱ्या प्रस्तावित रस्त्यावर घरे आणि व्यावसायिक इमारती बाधित होत आहे. हा रस्ता आराखड्यात 36 मी. रुंदीचा करू नये. शेतकऱ्यांना 50 टक्के जमिनीवर प्लॉट विकसित करून दिले जातील, असे प्रशासन सांगत असले तरी याबाबत शेतकऱ्यांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही.

आराखड्यात अनेक ठिकाणी रहिवासी झोन आहेत. त्यातील रस्त्यालगतच्या जमिनीवर व्यावसायिक क्षेत्र असावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात गाव पालिकेत गेले तर पुन्हा भूसंपादन करून आरक्षण पडणार का, अशी शंकाही ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केली. टीपी स्कीम बारगळली तर काय? असे प्रश्‍न उपस्थित केले असून या सर्व प्रश्‍नांची प्राधिकरणाने दखल घ्यावी आणि त्यांचे लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)