पुणे : मेट्रोसाठी 90 % भूसंपादन पूर्ण

10 टक्के जागा खासगी मालकांची


भूसंपादनासाठी नोटीस

पुणे- पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी असलेले जागेचे भूसंपादन 90 टक्के पूर्ण झाले आहे. महामेट्रोला सुमारे 40 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता होती. त्यातील जवळपास 36 हेक्‍टर शासकीय जागा ताब्यात आली आहे. तर उर्वरीत 4 हेक्‍टर जागा खासगी मालकांची असून त्यात सुमारे 50 ते 55 जागा मालकांचा समावेश आहे. या भूसंपादनाच्या नोटीस बजाविल्या असून त्यातील 6 जागा मालकांनी जागा देण्यास तयारी दर्शविली आहे.

या भूसंपादनाची माहिती महामेट्रोचे अधिकारी प्रकाश कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. वनाज ते धान्यगोदाम (रिच-2) या मार्गाचे प्रकल्प व्यस्थापक गौतम बिऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. महामेट्रोच्या या 31 किमीच्या या दोन्ही प्रकल्पांसाठी स्थानके, मेट्रो मार्ग, डेपो तसेच पार्किंगसाठी 40 हेक्‍टर जागेची गरज आहे. त्यात जवळपास 36 हेक्‍टर जागा महामेट्रोला मिळाली असून त्यात कृषी महाविद्यालय डेपो, कोथरूड कचरा डेपो, स्वारगेट ट्रान्सपोर्ट हब तसेच शासकीय धान्य गोदाम जागेचा समावेश आहे.

-Ads-

येथे मेट्रोने कामही सुरू केले आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश तसेच बाहेर पडण्यासाठी तसेच पार्किंग आणि इतर संचलनासाठी आणखी 3 हेक्‍टर खासगी जागेची आवश्‍यकता महामेट्रोला आहे. या जागांचे सुमारे 50 ते 55 जागा मालक असून त्यांना भूसंपादनाची नोटीस बजाविण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

तडजोडी ताबा घेण्यावर भर
मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या जागा तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत महामेट्रोचा प्रयत्न असल्याचे कदम यांनी सांगितले. 2014 च्या भूसंपादन कायद्यानुसार, जागा मालकांनी तडजोडीने जागा ताब्यात दिल्यास त्यांना जागेच्या रेडिरकनरच्या शासन दरानुसार, अडीचपट मोबदला दिला जाणार आहे.

तर तडजोडीने जागा न दिल्यास सक्तीच्या भूसंपादनातून जागा मालकांना दोन पटच मोबदला मिळणार आहे. त्यामुळे जागा मालकांशी महामेट्रोकडून चर्चा करण्यात येत आहे. तसेच जागांबाबत अथवा भूसंपादनाबाबत नागरिकांना काही तक्रारी अथवा त्यांच्या शंका असल्यास त्यांना माहिती देण्यासाठी घोले रोड येथील मेट्रोच्या कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)