पुणे मेट्रोसाठी 2 हजार कोटींचे कर्ज

फ्रेंच डेव्हलपमेंट बॅंक – भारत सरकार यांच्यात करार

पुणे/ दिल्ली – महाराष्ट्र मेट्रोच्या पुणे मेट्रो प्रकल्पासाठी इंडो-फ्रेंच भागीदारी अंतर्गत, “फ्रेंच डेव्हलपमेंट बॅंक’ (एएफडी) आणि भारत सरकारचे अर्थमंत्रालय यांच्यात सोमवारी युरो 245 मिलियन म्हणजेच जवळपास 2 हजार कोटी रुपयांचा क्रेडिट (कर्ज) सुविधा करार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी केंद्राच्या वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. सी. एस. मोहपात्र, भारत आणि बांगलादेशचे प्रादेशिक निदेशक निकोलस फॉरेनगे, फ्रान्सचे राजदूत अलेक्‍झांडर झिइग्लेर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांचे (एमओयूएचए) सहसचिव मुकुंद कुमार सिन्हा आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, वित्तविभागाचे संचालक एस. शिवमंथन्‌, तंत्रज्ञान संचालक सुनील माथुर, कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्‌ आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची 50-50 भागीदारी असलेले महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (महामेट्रो) हे पुणे मेट्रो प्रकल्प साकारत आहे. यासाठी अंदाजे एकूण प्रकल्प खर्च 11,420 कोटी रुपये आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक (ई आय बी) आणि ए एफ डी फ्रान्स या दोन वित्त एजन्सीकडून कर्ज घेतले जाणार आहे. सध्याचा करार हा 245 दशलक्ष युरोचा असून, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

इंडो-फ्रेंच भागीदारी अंतर्गत, शहरी लोकांच्या स्वच्छ, सर्व समाज घटक समावेशक आणि पर्यावरण पूरक प्रवासासाठी ए.एफ.डी फ्रान्सने महाराष्ट्र मेट्रोसाठी वित्तपुरवठा केलेला पुणे मेट्रो हा नागपूर मेट्रो (130 मिलियन यूरोज) नंतरचा दुसरा प्रकल्प आहे.

नवी दिल्लीत झालेल्या करारानंतर लवकरच पुण्यात यासंबंधी अधिक विस्तृत करारावर स्वाक्षरी करण्यात येतील. एएफडीकडून मिळणाऱ्या निधीचा वापर सिग्नलिंग ओ.एच. ई, वीज पुरवठा, दूरसंचार, नागरिक सुविधा इत्यादींसाठी वापरण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पाचे काम 27 % पेक्षा अधिक झाल्याचा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.

काय आहे “एएफडी’
“एएफडी’ ही फ्रान्सची वित्त पुरवठा आणि तांत्रिक साहाय्य पुरवणारी एजन्सी आहे. ती विकसनशील देशांमध्ये जीवनमान उंचावण्यासाठी ही कंपनी वित्तपुरवठा आणि तांत्रिक सल्ला देत आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणपूरक विकासाच्या ध्येयाने एएफडी ऊर्जा आरोग्य सुविधा जैव विविधता आणि डिजिटल तंत्रज्ञान प्रशिक्षण इ. बाबींबद्दल जगामध्ये मार्गदर्शक आणि वित्तपुरवठा करत असते. संपूर्ण जगात 85 ठिकाणी एएफडी चे कार्यालय असून, एएफडी सध्या 108 देशांमध्ये 2500 पेक्षा जास्त प्रकल्पांना वित्त आणि तांत्रिक गोष्टींचा पुरवठा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)