पुणे मेट्रोचे माहिती केंद्र अखेर संभाजी उद्यानातच

महापालिकेने दिली 2 गुंठे जागा


तंबूच्या साहित्याने उभारणार कक्ष

पुणे- पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने माहिती केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी सुरू असलेल्या जागेची शोध मोहीम अखेर वर्षभरानंतर थांबली आहे. या केंद्रासाठी श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील 2 गुंठे जागा तीन वर्षांच्या कराराने देण्यास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्या बाबतचे पत्रही महामेट्रोस पाठविण्यात आले आहे. त्यामुळे माहिती केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संभाजी उद्यानात बांधकामासाठी जागा शिल्लक नसल्याने तंबूच्या साहित्याने हे केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाची माहिती पुणेकरांना मिळावी, तसेच शंकाचे निराकारण होण्यायासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोला वर्दळीच्या ठिकाणची जागा हवी होती. त्यामुळे पालिकेकडे संभाजी उद्यानातील जागेची मागणी करण्यात आली. मात्र, या उद्यानात बांधकामासाठी जागाच नसल्याने महापालिकेने ही जागा देण्यास नकार देत महामेट्रोला कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी पाणी पुरवठा केंद्रातील 3 गुंठे अथवा पेशवे उद्यानाबाहेरील पार्किंगमधील 1 गुंठा जागा देण्यास तयारी दर्शविली होती.

मात्र, पेशवे उद्यानाची जागा दोन्ही मेट्रो मार्गापासून दूर असल्याने तर कर्वे रस्त्यावरील जागा सोयीची नसल्याने महामेट्रोकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेची मागणी महापालिकेकडे करण्यात येत होती. दोन आठवड्यांपूर्वी मेट्रोला जागा देण्याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत संभाजी उद्यानातील जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली होती. त्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिर पोलीस चौकीमागील 2 गुंठे जागा देण्यात येणार आहे.

…म्हणून पोलीस चौकीजवळील जागा
महामेट्रोच्या माहिती केंद्रासाठी उद्यान विभागाने संभाजी उद्यानाच्या गेटजवळील जागा देण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, उद्यान सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत बंद असल्याने माहिती केंद्रही बंद ठेवावे लागेल. त्यामुळे मेट्रोकडून ती जागा नाकारण्यात आली होती. दरम्यान, पोलीस चौकीच्या मागील बाजूस बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात उद्यानात जाण्यासाठी आणखी एक लहान गेट आहे. हे गेट दिवसभर उघडे ठेवणे शक्‍य असल्याने ही नवीन जागा निश्‍चित करण्यात आल्याचे उद्यान विभागप्रमुख अशोक घोरपडे म्हणाले. त्यामुळे उद्यान बंद असतानाही हे केंद्र सुरू राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)