पुणे-मुंबई महामार्गावरील देहुरोडच्या उड्‌डाणपुलास डिसेंबर अखेरचा मुहूर्त!

  • वाहतूक कोंडीतून देहुरोडची सुटका होणार

देहुरोड – पुणे-मुंबई महामार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4) देहुरोड येथील उड्‌डाणपुलाचे काम 15 डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचे माहिती रस्ते विकास महामंडळाने दिला. पथदिवे, दिशादर्शक, मार्गदर्शक फलक, रंगरंगोटी व किरकोळ कामे वगळता अन्य कामे पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडीतून देहुरोडची सुटका होणार आहे.

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील देहूरोड येथील उड्‌डाणपूल रस्त्याच्या (1070 मीटर) कामाला वेग घेतले आहे. 15 डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. नूतन वर्षात हे उड्‌डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले आहे.

देहुरोड येथील उड्‌डाण पुलाच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर विद्युत वाहिनी टाकणे, पथदिवे पोल उभारुन त्यावर पथदिवे बसविणे, सिमेंट कठडे व पिलर आदी रंगरंगोटी करणे, वाहतुकीचे दिशादर्शक मार्गदर्शक व सुरक्षेबाबत फलक लावणेसह उर्वरित कामे होऊन येत्या 15 डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता व संबंधित कंत्राटदाराच्या सुपरवायझर व अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन वर्षात 1070 मीटर अंतराच्या पूर्णत्वास येत असलेल्या उड्‌डाण पुलाच्या रस्त्याने मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने तसेच पुण्याहून येणारी वाहने आयुध निर्माणीपासून कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाजवळून थेट देहुरोड शहराबाहेर जाणार असल्याने देहुरोड बाजारपेठ भागातील जुने बॅंक ऑफ इंडिया व स्वामी विवेकानंद चौक या मुख्य चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नाचे निराकरण होणार आहे.

सेवा रस्ता दुरुस्ती जानेवारीत होणार
उड्‌डाणपुलावरील रस्त्याने थेट जाणारी वाहतूक सुरू झाल्यानंतर सेवा रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होणार आहे. त्यानंतर कंत्राटदारामार्फत विविध ठिकाणी दूरवस्था झालेला व दोन्ही बाजूंचा खचलेला सेवा रस्ता खोदून पुन्हा आधुनिक पद्धतीने डांबरीकरणाचे काम आगामी वर्षात जानेवारीत करण्यात येणार आहे.

सात महिन्यांची मुदतवाढ…
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहुरोड येथील लोहमार्गावरील उड्‌डाणपूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत 1070 मीटर लांबीचा उड्‌डाणपुलाचे काम पुण्यातील मे. टी अँड टी इन्फ्रास्ट्रुक्‍चर लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या कामासाठी 43 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 1 डिसेंबर 2016 ते 31 मे 2018 दरम्यान म्हणजे 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत होती. लोहमार्गावरील रुंदीकरण वाढवण्यासाठी लोहमार्ग पुलाचे काम आवश्‍यक होते. मात्र लोहमार्ग प्रशासनाकडून मिळणाऱ्या मंजुरीस विलंब झाल्याने तसेच विविध कारणांमुळे संबंधित कामे रेंगाळली होती. त्यामुळे आणखी सात महिन्यांची मुदत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उड्‌डाणपुलाखाली सुमारे 23 सिमेंट पोल असून, दोन पोल पुलाला जोडणारे आहे. रिपब्लिक स्कूलजवळ सर्वात उंच भाग म्हणजे सुमारे सात मीटर (23.33 फूट) उंच असून, जुना बॅंक ऑफ इंडिया चौक व स्वामी विवेकानंद चौक या भागात उतार होत गेलेला असल्याने मुख्य चौकातील उंची मध्यभागापेक्षा काही इंची कमी आहे, तर निगडी जकात नाका ते सेंट्रल चौक दरम्यानचा संपूर्ण रस्ता सुमारे 6.3 किमी अंतराचा आहे. या रस्त्यावरील उड्डाणपूल वगळता रस्त्याचे 24 मीटर रुंदीचा चौपदरीकरण करण्याचे काम “पीबीए’ या कंत्राटदारास 39 करोड सहा लाख रुपये खर्चाची तरतुदी करण्यात आली आहे.

महामार्गावरील अपघाती क्षेत्र…
पुणे-मुंबई महामार्गावरील “डिफेन्स’ येथे देहू फाट्याला जोडणारा भाग म्हणजेच तीर्थक्षेत्र देहूकडे जाणारा मार्ग तसेच मुंबईकडे जाणारा उड्‌डाण पुलाच्या अखेर गुरुद्वाराजवळ वळण असल्याने व डॉ. आंबेडकर रुग्णालयाजवळ अरूंद रस्ता असल्याने धोकादायक क्षेत्र बनल्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. याच मार्गवरील उड्‌डाणपुलाखाली म्हणजेच बाजार परिसरात साडेसात मीटरचा असणारा सेवा रस्ता अनेक ठिकाणी कमी होऊन सुमारे साडेपाच मीटर अंतराचा असल्याने वारंवार दुर्घटना घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. चौपदरीकरण व उड्‌डाण पुलाचे काम सुरू असताना अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही आदेशांना केराची टोपली दाखवल्यामुळे अनेक वेळा कंटेनर, अवजड वाहनांची उड्‌डाणपुलाखालील सिमेंट पोलला धडकून अडकल्याची घटना घडल्या आहे. शनिवारी (दि. 24) सायंकाळी सव्वासहा व रविवारी दुपारी बाराच्या सुमारास म्हणजेच 18 तासांत सिमेंट पोल क्रमांक एक जवळ कंटेनर अडकल्याची घटना घडल्या आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)