पुणे – वाहनचालकांमध्ये जनजागृती आणि अन्य माहिती मिळण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर दिशादर्शक आणि जनजागृतीपर फलक तसेच ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हे फलक आणि साईनबोर्ड लावण्याचे काम गुरूवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक जुन्या पुणे- मुंबई या महामार्गावरुन वळविण्यात येणार आहे. दरम्यान; त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामार्ग पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड यांच्या वतीने पुणे-मुंबई एक्‍सप्रेस-वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याशिवाय आवश्‍यक त्याठिकाणी दिशादर्शक आणि जनजागृतीपर फलक लावण्यात येणार आहे. यासाठी किमान दीड तासांहूनही अधिक कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या महामार्गवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग दुपारी बारा ते दोन या कालावधीत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे; ही वाहतूक जुना पुणे-मुंबई या पर्यायी महामार्गावरुन वळविण्यात येणार आहे असे महामार्ग पोलीसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन ही वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा; तसेच या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येणार आहे; त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही; असे आवाहन महामार्ग पोलीसांच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)