पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वरील पुलावरून कांद्याचा ट्रक कोसळला; दोघे गंभीर जखमी

लोणावळा – पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वरून मुंबईला कांदे घेऊन जाणारा ट्रक एक्‍सप्रेस वेच्या लोणावळा “एक्‍झिट’ येथील दोन्ही पुलाच्या मध्यभागी सुमारे 50 फूट उंचीवरून जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुलाखालीच्या काही दुकानांजवळ पडला. सुदैवाने यादरम्यान दुकानाजवळ कोणीही नव्हते, तसेच हा ट्रक जुन्या मार्गावर पडला नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 1) सकाळी साडेसहा वाजता वलवण येथील लोणावळा “एक्‍झिट’जवळ झाला आहे. कांद्याच्या ट्रकच्या अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांची कांदे नेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर येथून मुंबईला एक ट्रक (एम.एच.13 ए.एक्‍स. 8127) कांदे घेऊन जात होता. भरधाव वेगामुळे ट्रक चालकाचे लोणावळा एक्‍झिट येथील अंतरवळणावर नियंत्रण सुटले. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक वेगात मार्गालगतच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळून सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर घासरत दोन्ही मार्गावरील पुलांच्या कठड्यावरून घासत सुमारे 50 फूट उंचीवरून खाली पडला. या घटनेत ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात सुदैवाने ट्रक जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर गेला नाही. तसेच या ठिकाणी दोन्ही पुलांखाली काही दुकाने आहे, मात्र सुदैवाने यादरम्यान कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांद्यासाठी स्थानिकांची झुंबड!
अपघाताची खबर परिसरात समजताच परिसरातील शेकडो नागरिकांनी कांदे नेण्यासाठी घटनास्थळी झुंबड उडाली होती. प्रत्येकांनी मिळेल तितके कांदे गोळा करून गोण्या व पिशव्यांतून घेऊन गेले. स्थानिकांचे हे दृश्‍य पाहून या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी कांदे गोळा करण्याची संधी सोडली नाही. जवळ जवळ दोन तास कांदे गोळा करण्याचा सपाटा नागरिकांनी लावला होता. काहींनी तर पुलाच्यावर असलेल्या छतावर 20 ते 25 फूट चढून कांदे गोळा करून घेऊन गेले.

काही काळ धिम्या गतीने वाहतूक
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने आयआरबीच्या देवदूत आपत्कालीन पथकाने जखमी ट्रक चालक त्याच्या सहकार्याला उपचारासाठी पुण्याला दाखल केले. अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहर व खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले. अपघातामुळे ट्रकमधील संपूर्ण कांदे घटनास्थळी व जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर विखुरला होता. जुन्या मार्गावर विखुरलेल्या कांद्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ट्रक बाजूला केल्यानंतर आयरबीआयच्या कर्मचाऱ्यांनी मार्गावर सांडलेले ऑइल व डिझेलवर माती टाकून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)