पुणे – मुंढवा-घोरपडी रेल्वे गेटचे त्रांगडे सुटेना

दर 15 मिनिटांनी प्रचंड कोंडी : उड्डाणपुलाची मागणी केराच्या टोपलीत


छोट्या पुलाचे रुंदीकरण करण्याचा कॅन्टोन्मेंट बोर्ड सभेपुढे प्रस्ताव

पुणे – मुंढवा आणि घोरपडी येथील रेल्वे गेटजवळ होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखील झाली असून त्यात या मार्गावरील एका अरूंद पुलाचीही समस्या सुटत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही याठिकाणचे काम अजूनही सुरू झालेले नाही.

पुणे-दौंड रेल्वे मार्गावर मुंढवा येथील रेल्वे गेट आहे. तर, तेथून काही अंतरावर पुणे-मिरज लाइनवरील रेल्वे गेट आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासी आणि मालवाहू रेल्वेगाड्यांची संख्या या दोन्ही मार्गांवर प्रचंड आहे. त्यामुळे साधारणपणे दर 15 मिनिटांनी वाहतूक कोंडी ठरलेली आहे. या दोन्ही रेल्वेलाइनवरून उड्डाणपूल उभारण्याचा प्रश्‍न गेल्या 25 वर्षांपासून रखडला आहे. निवडणुका आल्या, की या पुलाचा मुद्दा तापविला जातो. या परिसरातील काही भाग लष्कराच्या हद्दीत येतो. तर, काही जागेवर रेल्वे बोर्डाची मालकी आहे. उर्वरित जागा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत येते. या प्रश्‍नावर तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या पुलासाठी मंजुरी दिल्याच्या जाहिरातीदेखील त्यावेळी झळकविण्यात आल्या. पण, पुढे या पुलासाठी एकही नवीन वीट रचण्यात आलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंढवा ते घोरपडी मार्गावर एका अरूंद पुलामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंढवा रेल्वेगेटच्या जवळच हा पूल आहे. गेट बंद झाल्यानंतर वाहनांची प्रचंड गर्दी होते. बी. टी. कवडे रस्त्यावरून येणारी वाहने आणि रेल्वे गेटसमोर थांबलेली वाहने तसेच जयहिंद चौकाकडून बी. टी. कवडे रस्त्याकडे जाणारी वाहने अशी सर्व वाहने या पुलावर एकत्र येतात. परिणामी, येथे कोंडी होते. दिवसातून अनेक वेळा रेल्वे गेट बंद होते. तसेच या ठिकाणी अनेक शाळा आहेत. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. मात्र रेल्वे आणि लष्कर या दोन्हींमधील हद्दीच्या कारणामुळे या पुलाचे काम रखडले आहे. ब्रिटिशकालीन असलेला या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिटदेखील करण्यात आले असून, यात पुलाच्या दुरूस्तीची गरज प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली आहे. मात्र अजूनही त्याबाबत कोणते पाऊल उचलले नाही.

रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असलेल्या पुलाचे काम महापालिकेकडून केले जाणार असून त्यासाठी मंजुरीदेखील मिळाली आहे. मात्र, लष्कराच्या हद्दीतील कामाबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने, पुलाचे काम रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलाच्या दुरूस्तीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला सुमारे 3 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवून तो संरक्षण मालमत्ता विभागाच्या प्रधान संचालकांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संरक्षण विभागाने मंजुरी दिल्यावर पुलाची दुरूस्ती सुरू करता येईल. पुलाबाबत लवकर निर्णय होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)