पुणे: महावितरणमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार नव्याने भरती

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भरतीस प्रारंभ ः ऑनलाइन परीक्षापद्धत्त

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत कामाचा वाढलेला ताण आणि त्या तुलनेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या यांचा ताळमेळ बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यादिशेने प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भरती प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वीजयंत्रणेचा आत्मा समजल्या जाणाऱ्या विद्युत सहाय्यकांची पदे जास्ती प्रमाणात भरण्यावर प्रशासनाच्या वतीने भर देण्यात येणार आहे. ही सर्व भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी ऑनलाईन पद्धत्तीने भरण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरणच्या कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कामगारांच्या संख्येवर आणि नव्याने करण्यात येणाऱ्या भरतीवर निर्बंध लादण्यात आल्याने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत कामगारांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कामगारांवर कामाचा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली होती. त्यासाठी महावितरण प्रशासनाला वर्षाकाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करावा लागत आहे. त्याशिवाय हे कामगार कंत्राटी पद्धत्तीवर असल्याने त्यांच्यावर जबाबदारीही टाकता येत नाही. त्यामुळेच प्रशासनातील महत्त्वाच्या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार याबाबातची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरणची सर्वाधिक मदार ही विद्युत सहाय्यक म्हणजेच वायरमनवर अवलंबून असते. त्यामुळे नव्याने भरती प्रक्रिया राबविताना या पदांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याशिवाय इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, कार्यालयीन वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. जाहिरातीच्या माध्यमातून आणि ऑनलाईन पद्धत्तीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शी होण्यास मदत होइल असा दावा महावितरणच्या सूत्रांनी व्यक्त केला.

वरिष्ठ पदे सरळसेवा पद्धत्तीने भरणार
प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संधी मिळावी आणि त्यांच्या कामाचे चीज व्हावे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून महावितरण प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ पदे ही सरळसेवा भरती प्रक्रियेने भरण्यात येतात. त्यानुसार अनेक अधिकाऱ्यांना थेट पद्धत्तीने कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही याच पद्धत्तीने ही पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)