पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; माऊली जमदाडे, मुन्ना झुंझुरके यांचे विजय

पुणे – विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत व तुर्कस्तान यांच्यातील लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहलीला मात्र यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

भारत विरुद्ध तुर्कस्तान यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या लढतीत मुन्ना झुंझुरकेने ईयुप ओरमानला पराभूत केले. लढतीतील केवळ तिसऱ्याच मिनिटाला मुन्नाने लाटणे डाव टाकताना ओरमानला चितपट करीत विजय साकारला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत माऊली जमदाडेने तुर्कस्तानच्या गुऱ्हकन बल्कीला पराभूत केले. माऊलीच्या आक्रमक चढाईमुळे बल्की याने मैदानाबाहेर जाण्याचे डावपेच वापरले. त्यानंतर काही क्षणातच माऊलीने घिस्सा डावावर बल्कीला चीतपट करत विजय मिळविला.

उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने एकचाक डावात मुसंडी मारत तुर्कस्तानच्या मेटीन तेझमीला आसमान दाखवले. मात्र हिंदकेसरी साबा कोहलीला तुर्कस्तानच्या इस्माईल इरकल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडूंना गुण मिळविण्यात अपयश आले. आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रथम गुण मिळविणाऱ्या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. तुर्कस्थानच्या इस्माईल इरकलने गुण मिळवत ही लढत जिंकली. आणखी एका चुरशीच्या झालेल्या लढतीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने तुर्कस्तानच्या अहमत सिलबिस्टला पराभूत केले. या लढतीतील सहाव्या मिनिटाला विजय चौधरी याने घुटना डाव टाकत अहमत सिलबिस्टला चितपट करताना विजय मिळविला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर मुक्‍ता टिळक, आयोजक व माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्‍त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक व मनपा क्रीडा उपायुक्‍त तुषार दौंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सह.पोलीस आयुक्‍त राजेंद्र भामरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगरचे कार्यवाह बापूजी घाटपांडे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, राजेंद्र येनपुरे, सुशील मेंगडे, राजेंद्र खेडेकर, मंजुषा खेडेकर, छायाताई मारणे, दीपक पोटे, हेमंत रासने, उमेश गायकवाड, अमोल बालवडकर, किरण दगडे, शिवराम मेंगडे, राजाभाऊ बराटे, वासंती जाधव, आबा बागुल, सचिन दोडके, रघुनाथ गवडा, संदीप खर्डेकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर उपस्थित होते.

तसेच कुस्ती क्षेत्रातील हिंदकेसरी दीनानाथ सिंह, ऑलिम्पिकवीर काका पवार, मारुती आडकर, हिंदकेसरी योगेश दोडके, अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, अमोल बुचडे, अभिजित कटके, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते विलास कथुरे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव किसनराव बुचडे महराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सदस्य मेघराज कटके, गणेश दांगट, आशियाई पदक विजेते राम सारंग, उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील, संतोष गरुड, राष्ट्रपती पदक विजेते कैलास मोहोळ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, शिवाजी बुचडे या मान्यवरांनी स्पर्धेला हजेरी लावली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नवनाथ जाधव, दिनेश माथवड, नीलेश कोंढाळकर, गणेश वरपे, श्रीधर मोहोळ, सचिन पवार, संतोष मोहोळ, ज्ञानेश्वर मोहोळ, दुष्यंत मोहोळ, विलास मोहोळ यांनी विशेष मेहनत घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)