पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधव उपान्त्य फेरीत

पुणे – पुण्याच्या विकास जाधवने मध्य प्रदेशच्या अभिषेक पवारला भारंदाज डावावर, तर सोलापूरच्या गणेश जगतापने सेनादलाच्या नरेशला लपेट डावावर चीतपट करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटाच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या सचिन येलभर व साबा कोहली यांनीही उपान्त्य फेरी गाठली. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपान्त्यपूर्व लढतीमध्ये पुण्याच्या विकास जाधव समोर मध्य प्रदेशच्या अभिषेक पवारचे आव्हान होते. लढतीमध्ये विकासने भारंदाज डाव टाकताना अभिषेक पवारला 10-0 असे पराभूत केले. सोलापूरच्या गणेश जगतापने सैन्यदलाच्या नरेशला लपेट डावाच्या सहाय्याने पराभूत करताना स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. पुणे जिल्ह्याचा सचिन येलभर व साबा कोहली यांचे प्रतिस्पर्धी अनुपस्थित असल्याने ते थेट उपान्त्य फेरीत दाखल झाले. उपांत्य फेरीत पुणे जिल्ह्याच्या सचिन येलभरसमोर सोलापूरच्या गणेश जगतापचे तर पुणे शहरच्या विकास जाधवसमोर साबा कोहलीचे आव्हान आहे.

स्पर्धेतील 61 किलो वजनी गटात उपान्त्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या भरत पाटीलने सांगलीच्या धनंजय गोरडला चितपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने सोलापूरच्या सागर राउतला 10-3 असे तांत्रिक गुणांच्या सहाय्याने पराभूत करताना स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. अंतिम फेरीत कोल्हापूर भरत पाटीलसमोर कोल्हापूरच्याच सौरभ पाटीलचे आव्हान असणार आहे.

57 किलो वजनी गटाच्या उपान्त्य फेरीच्या लढतीमध्ये कोल्हापूरच्या विक्रम मोरेने कोल्हापूरच्याच ओंकार लाडला (10-5) तर, पुणे जिल्ह्याच्या सागर मरकडने कोल्हापूरच्या अभिजित पाटीलला (10-6) पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पुणे जिल्ह्याच्या सागर मरकड समोर कोल्हापूरच्या विक्रम मोरेचे आव्हान राहणार आहे.

  रणजीत नलावडे, कौतुक डाफळे, सागर मरकड अंतिम फेरीत

अहमदनगरच्या अजित शेळकेने पुणे शहरच्या प्रज्ज्वल उभेला 10-5 तांत्रिक गुणांच्या सहाय्याने पराभूत करताना 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोल्हापूरच्या रणजीत नलावडेने पुणे जिल्ह्याच्या सद्दाम जमादारला 10-6 असे पराभूत करताना अंतिम फेरीतील आपले आव्हान कायम राखले. अंतिम फेरीत कोल्हापूरच्या रणजीत नलावडे समोर अहमदनगरच्या अजित शेळकेचे आव्हान आहे. कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने अहमदनगरच्या विक्रम शेटेचे आव्हान 10-4 असे मोडून काढताना 86 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला. बीडच्या अमोल मुंढेने पुण्याच्या अनिकेत खोपडेला पराभूत करताना अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत कोल्हापूरचा कौतुक डाफळे व बीडचा अमोल मुंढे आमने-सामने असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)