पुणे: महापालिकेचे कोट्यवधी रुपये “कचऱ्यात’

अनेक कचरा प्रकल्प अजूनही ठप्पच : आधारित वीज प्रकल्पही बंदच
सजग नागरिक मंचने केले गंभीर आरोप

पुणे – शहरात कचऱ्यांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून 25 प्रकल्प सुरू केले. परंतु यामधील अनेक प्रकल्प बंद पडले असून, सुरू असलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या नावाखाली महापालिकेने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचा आरोप “सजग नागरिक मंच’ने केला आहे. तसेच या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे.

वीजनिर्मिती फक्त 31 टक्के क्षमतेने
या सर्व प्रकल्पात पाठवलेल्या कचऱ्यापासून या प्रकल्पांमध्ये फक्त 53 टक्के क्षमतेने गॅस निर्मिती झाली आहे. तसेच या पाच टनाच्या 25 प्रकल्पांमध्ये दरमहा 4 ,50 ,000.0 युनिट्‌स वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे, ज्यातून मनपाचे दरमहा 28 लाख रुपये वीज बिल बचत होऊन वर्षभरात 3.50 कोटी रुपये वाचणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात वर्षभरात वीजनिर्मिती फक्त 31 टक्के क्षमतेने झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. आहे. याबाबत प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांच्या पैशांचा कचरा होत असल्याचा आरोपही या प्रतिनिधींनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

“सजग नागरिक मंच’ने केलेल्या पाहणीत आणि माहिती अधिकारातून मंचचे प्रतिनिधी विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी मागवलेल्या माहितीतूनही हे उघड झाले आहे. महापालिकेने गेल्या काही वर्षात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारे 25 प्रकल्प शहराच्या विविध भागांमध्ये उभारले आहेत. त्यातून 125 टन कचऱ्यावर प्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या प्रकल्पांसाठी 16 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे.

यामधील बाणेर, हडपसर एक, हडपसर दोन, पेशवे पार्क एक आणि कात्रज रेल्वे म्युजियम असे पाच प्रकल्प बंद पडले आहेत. याठिकाणी एक टन ही कचराही पाठवला गेलेला नाही तसेच गॅस आणि वीज निर्मिती झालेली नाही. एवढेच नव्हे तर यामधील प्रकल्प करार नूतनीकरणासाठी अभावी बंद पडले आहेत. याशिवाय येरवडा, वडगाव एक, वडगाव दोन, घोले रोड, वानवडी या 5 प्रकल्पात एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही. तसेच पेशवे पार्क दोन , घोले रोड, वडगाव एक, वडगाव दोन या प्रकल्पांमध्ये 45 टक्के पेक्षा कमी कचरा जिरवला गेला. एकूण दररोज 125 टन कचरा जिरविण्याची क्षमता असणाऱ्या या 25 प्रकल्पात मिळून सरासरी 65 टक्के कचरा पाठवला गेला असल्याचे माहितीतून दिसून आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)