पुणे – मराठी भाषेचे सर्वांनी जतन केले पाहिजे

डॉ. अरुणा ढेरे : शिक्षण माझा वसा पुरस्काराचे वितरण

पुणे – “भाषा आणि साहित्य हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. मराठी भाषेचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे. मराठी शाळा वाचाव्यात म्हणून आपण शासनाला वेठीस धरतो, पण आपण स्वतः किती प्रयत्न करतो? मुलांना भाषा आणि साहित्याची गोडी लागावी, यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी काम करणे खूप गरजेचे आहे. आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर अनेक साधी माणसे आपल्या परीने काम करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे, असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या. त्या “शिक्षण माझा वसा’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’, “टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन’ आदी संस्थांच्या वतीने आयोजित केलेला “शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी “ज्योतीने तेजाची आरती’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार म.ए.सो.चे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मानपत्र आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी सचिन बेंडभर, सतीश चिंधालोरे, अमर खेडेकर, संतोष पाटील, अमोल हंकारे, महेश शिंदे, संतोष दातीर, लीना सुमंत, प्राजक्‍ता पारेकर, ज्योती पोकळे, बबन गायकवाड, कल्पना वाघ या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, सादर झालेल्या “ज्योतीने तेजाची आरती’ या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी गदिमांनी लिहिलेली आणि बाबुजींनी संगीतबद्ध केलेली गीते सादर केली. यामध्ये “आई व्हावी मुलगी माझी’, “आवडती भारी मज माझे आजोबा’, “बिनभिंतींची उघडी शाळा’अशी आदी गीते सादर केली.

यावेळी “टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन’चे चेअरमन ऍड. किशोर लुल्ला, राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात म.ए.सो. बालशिक्षण इंग्लिश मीडियम शाळेच्या संस्कृत गीतगायनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पोकळे आणि मनाली गावंडे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)