पुणे : भीमा कोरेगाव येथील पिडितांना महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात निवासाची सोय

पुणे – भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीतील पिडीत सुरेश सकट आणि अशोक आठवले यांना तसेच कुटुंबियांना महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपाची निवासाची सोय करून दिली आहे. कसबा पेठ येथील महापालिकेच्या ताब्यातील जागेमध्ये त्यांची निवासाची सोय करण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या संदर्भातील पत्र या दोन्ही कुटुंबांना दिले. ही दोन्ही कुटुंबे एक जूनपासून महापालिकेसमोर धरणे आंदोलनाला बसले होते.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जानराव, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीत सकट आणि आठवले कुटुंबाचे राहते घर जळाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांना बेघर व्हावे लागले. त्यांना कोणताही निवारा नसल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र महापालिकेने विशेष बाब म्हणून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आसरा देण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांमध्ये या दोन कुटुंबियांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक पाच मधील दोन सदनिका या दोन्ही कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सदनिका प्रती महिना एक रुपया नाममात्र भाडेकराराने 11 महिन्यांसाठी देण्यात आल्या आहेत. या घरांमध्ये राहताना लागणारे वीजबिल संबंधित सदनिकाधारकांनी भरायचे आहे, असे या आदेशपत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)