पुणे – भिडे, एकबोटे समर्थकांची नदीपात्रात ‘एकजूट’

समर्थनार्थ ठिय्या देत गुन्हे माघे घेण्याची शिवप्रतिष्ठन हिंदुस्थानची मागणी

पुणे – कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलींद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा या घटनेशी संबंध नसून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी ओंकारेश्‍वरजवळील नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. परंतू, ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नदीपात्रात आंदोलन करण्यात आले.

भिडे गुरुजी निर्दोष आहेत. भिडे गुरुजींना न्याय मिळालाच पाहिजे, जातीय द्वेष पसरवणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, होय मी मिलिंद एकबोटे समर्थक… असा मजकूर असलेले फलक हाती घेत आणि भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांसह माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, पुणे महानगर कार्यवाह प्रा. पराशर मोने, जिल्हाप्रमुख संजय जढर, मुकुंद मासाळ, संजय पासलकर, अविनाश मरकळे, ओंकार लांडगे, संतोष गोपाळ, रमेश कोंडे, नगरसेवक धीरज घाटे, गणेश जगताप, आदीत्य मांजरे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. बुधवारी सकाळपासूनच शहर व आसपासच्या परिसरातून प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आंदोलन स्थळी दाखल होत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जमलेली गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनी नदीपात्राच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांच्या मार्गात बदल केला होता. यावेळी कोणता अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मृत राहुलला न्याय कधी?
कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत झालेल्या राहुल फटांगडे यांची आई देखील आंदोलनात सहभागी झाली होती. कोरेगाव भीमा हिंसाचारात माझ्या मुलाचा मृत्यू झाला असून त्याला न्याय कधी मिळणार? माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी राहुल फटांगडे याची आई जनाबाई फटांगडे यांनी यावेळी केली.

मिलिंद एकबोटेंवरील मूळ एफआयआर खोटी : ज्योत्स्ना एकबोटे
कोरेगाव भीमा दंगलीचा तपास चुकीच्या दिशेने होत आहे. ज्या महिलेने आरोप केले होते तीने भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना मी पाहीलेले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मूळ एफआयआरच खोटी आहे, तर कोणत्या आधारावर आरोप केले जात आहेत?. दोघेही निर्दोष आहेत आणि मिलिंद एकबोटेंची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी करत मिलिंद एकबोटे यांनी एल्गार परिषदेला विरोध केला होता. स्वत:च्या सहीने त्यांनी पत्रक काढले होते. ज्याला दंगल करायची असेल तो स्वत:च्या सहीने पत्र देणार नाही, असे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या.

प्रकाश आंबेडकरांची ब्रेन मॅपिंग चाचणी व्हावी
शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत उमर खालिद, जिग्नेश मेवाणी आणि माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केलेल्या भाषणांमुळे दंगल उसळली. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. तसेच, प्रकाश आंबेडकरांचा नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांशी असलेला संबंध लक्षात घेता, दंगलीच्या पूर्वनियोजित कटात आंबेडकर यांचा सहभाग असला पाहिजे. त्यामुळे त्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी देखील करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)