20 मार्चनंतरच जाहीर होणार : शिवसेनेने संभाव्य नावे जाहीर
पुणे – राज्यात युती झाली असली तरी अद्याप तिकिटांचे वाटप झालेले नाही. शिवसेनेने संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी भाजपने मात्र सगळीच नावे गुलदस्त्यात ठेवली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासह इतर महत्त्वाच्या मतदारसंघातील नावांची यादी वीस मार्चनंतरच जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
पुणे जिल्ह्यात भाजपकडे पुणे आणि बारामती मतदार संघ आहे; तर उर्वरित दोन मतदार संघ हे शिवसेनेकडे आहेत. पुणे पालिकेवर भाजपची सत्ता असल्याने तसेच आठही आमदार भाजपचे असल्याने पुणे मतदार संघात इच्छुकांची संख्या सुद्धा अधिक आहे. त्यामुळेच या मतदार संघातून कोणाला तिकीट मिळणार याबाबत सगळ्याच्या मनात उत्सुकता आहे.
दुसरीकडे भाजपने नावाची यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे सगळीकडे जर तर चे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात प्रदेश भाजप कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील उमेदवारांची नावे ही दिल्लीतून जाहीर होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील नावांचाही समावेश असणार आहे. साधारण वीस मार्चनंतरच टप्याटप्याने नावे जाहीर केली जातील, तोपर्यंत पक्षाच्यावतीने विविध भागांत प्रचार दौरे आखण्यात येणार आहेत.