पुणे – भाऊ मी तुमचाच…!

इच्छुकांना शब्द देताना कार्यकर्त्यांची होते गोची


भाजपकडून उमेदवार निवडीबाबत सस्पेन्स कायम


इच्छुकांकडून नगरसेवक, पदाधिकारी यांच्या गाठी-भेटींना वेग

पुणे – भारतीय जनता पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निवडीबाबत सस्पेन्स कायम ठेवला जात असल्याने पक्षातील नगरसेवक तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. इच्छूक उमेदवारांनी या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना मेळावे तसेच भेटण्यासाठी बोलविले जात आहेत. त्यातच, भाजपतील जवळपास 50 टक्‍यांपेक्षा अधिक नगरसेवक संजय काकडे गटातील असल्याने या नगरसेवकांना तसेच पदाधिकाऱ्यांना प्रत्येक इच्छुकाला “भाऊ मी तुमचाच’ असे सांगण्याची वेळ आली आहे. तर सकाळी एका इच्छुकाजवळ दुपारी दुसऱ्याजवळ तर संध्याकाळी तिसऱ्यासोबत असा दिनक्रम या पदाधिकाऱ्यांचा सुरू असल्याने प्रत्येकालाच शब्द देताना, या नगरसेवकांची तसेच पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे.

भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी अद्याप पुण्यात उमेदवार कोण असेल हे जाहीर केले नाही. तर, विद्यमान खासदाराला पुन्हा संधी दिली जाईल याबाबत स्पष्टपणे पक्षातील वरिष्ठांकडून सांगण्यात येत नाही. त्यामुळे भाजप विद्यमान उमेदवार कायम ठेवणार की उमेदवारीची माळ नवीन चेहऱ्याच्या गळ्यात घालणार याबाबत उत्सूकता आहे. त्यातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही भाजपच्या तिकिटावर उमेदवारीचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये जाण्याची घोषणा केल्यानंतर काकडे यांनी त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांत उमेदवारीबाबत काहीच वक्तव्य केले नसले तरी, महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश घडवून आणलेल्या आपल्या गटाच्या नगरसेवकांना आपण कोणाचेही उमेदवार झालो तरी मदत करण्याचे साकडे घातले जात असून त्यांच्या भेटी गाठीला वेग आला आहे. असे असतानाच पालकमंत्री गिरीश बापट हे सुध्दा सक्रीय झाले आहेत. त्यांनी स्नेहमेळाव्यांचा सपाटा लावला असून या नगरसेवकांनाही सोबत घेत, उमेदवार कोणीही असो मदत करण्याची साद घातली जात आहे. तर शिरोळे हे स्वत: नगरसेवकांच्या भेटीला जात असून आपल्या गोटातील वरिष्ठांकडून भाजप नगरसेवकांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे भाजप नगरसेवक सध्या शिरोळे, काकडे आणि बापट या तिघांच्या संपर्कात असून दररोज किमान एक फोन, मेसेज अथवा प्रत्यक्ष भेट होत असल्याचे हे नगरसेवक सांगत आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल याचा कयास लागत नसला तरी, कोणालाही दुखवायला नको म्हणून कार्यकर्ते, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी तूर्तास “भाऊ मी तुमचाचं…!’ हा नारा जवळ केला असल्याचे चित्र भाजपमध्ये आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)