पुणे – ‘भाई’ चित्रपटांतील दृश्‍यांविरोधात प्रभा अत्रे यांचा “आवाज’

हिराबाई बडोदेकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप

पुणे – “भाई-व्यक्ती आणि वल्ली’ या चित्रपटात ज्येष्ठ गायिका दिवंगत हिराबाई बडोदेकर यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी केला आहे. तसे पत्रही त्यांनी प्रसिद्धीला दिले असून, “हा चित्रपट हिराबाईंच्या व्यक्तीमत्त्वाला बदनाम करणारा, त्यांचा अपमान करणारा आहे,’ असेही या पत्रात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“या चित्रपटात हिराबाईंविषयी जे चित्रण झाले आहे ते पाहून खूप वाईट वाटले आणि रागही आला. केवळ हिराबाईंच्या काळातच नव्हे तर आजही एक आदर्श स्त्री कलाकार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्यंत शालीन, सौम्य, मृदु आणि भारदस्त असे त्यांचे वागणे आणि बोलणे होते. मात्र हा चित्रपट त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला बदनाम करणारा आणि त्यांचा अपमान करणारा आहे,’ असे अत्रे यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

“पु. ल. देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्यापेक्षा हिराबाई या 15-20 वर्षांनी मोठ्या आहेत. त्या सगळ्यांना त्या मातृस्थानी, गुरूस्थानी होत्या. अशावेळी त्या तिघांनी हिराबाईंचा उल्लेख एकेरी केल्याचे या चित्रपटात दाखवले आहे. याशिवाय त्यांचे घर हे दारू मिळण्याची जागा आहे, तसेच हिराबाईंच्या घरी जाण्यापूर्वीचे पु.ल., वसंतराव आणि भीमसेनजी यांच्यातील संभाषण, अभिनय हे देखील हिराबाईंचे चारित्र्यहनन करणारे आहे,’ असेही अत्रे यांनी या पत्रात म्हटले आहे.

“एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसंबंधात चित्रिकरण करताना त्या व्यक्तीविषयीची माहिती काळजीपूर्वक आणि जबाबदारीने अभ्यासपूर्वक गोळा केली पाहिजे, तसेच त्यांच्या जवळच्या माणसांशी त्याविषयी चर्चा करायला हवी. आज शोधकार्यासाठी संदर्भ सामग्री म्हणून चित्रपट, डॉक्‍युमेंटरी या गोष्टींचा उपयोग केला जातो. मात्र या चित्रपटात निर्माता, दिग्दर्शक यांच्या मनात काही वेगळ सांगायचे असले तरीही ज्या पद्धतीने त्याचे चित्रीकरण झाले आहे त्यामुळे नको असलेला संदेशही लोकांपर्यंत जात आहे,’ ही गंभीर बाब आहे, असे अत्रे यांनी पत्रात नमूद केले आहे.

“भाई’ चित्रपट मद्यपानावर आहे, की काय? अशी शंका येते. तसेच पु.ल., भीमसेनजी आणि वसंतराव यांचे नको तितके मद्यपानाचे दृश्‍य यामध्ये टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्‍तीमत्त्वावर अन्याय झाला आहे. त्यांच्या कार्यावर चित्रपटातून जास्त प्रकाश टाकणे आवश्‍यक होते. या दृष्टीकोनातून हा चित्रपट अयशस्वी ठरला आहे.
– प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)