विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचे पुण्यात आंदोलन

पुणे – प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून भरतीप्रक्रियात्वरीत सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारी धरणे व निदर्शने करण्यात आली. यावेळी भर पावसातही जवळपास दोनशे ते अडीचशे प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 2013 पासून बेकायदेशीरपणे थकविलेला 71 दिवसांचा पगार मिळावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी निवृत्तीयोजना सर्वांना लागू करावी, विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातून वेतन व्यवस्था निर्माण करावी, विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्यांना नियमित व पूर्ण वेतन मिळावे, प्राध्यापकांसाठी व्यथा निवारण यंत्रणा स्थापित करावी आदी मागण्या करण्यात आल्या. त्याबरोबर विद्यापिठातील नॉमिनेशनचा धुमाकूळ कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी केली. यावेळी प्राध्यापक डॉ. के. एल. गिरमकर म्हणाले, आजपासून या आंदोलनास सुरुवात झाली असून राज्यातील दहा विभागीय स्तरावर ही आंदोलने केली जाणार आहेत. या आंदोलनासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नगर, नाशिक व पुण्यातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी मागण्यांचे निवेदन सहसंचालक डॉ.विजय नारखेडे यांना देण्यात आले.

यावेळी डॉ. प्रा. एस. पी. लवांडे, प्रा. एस. के. पवार, प्रा. पी. एस. मुटकुले, प्रा. डॉ. व्ही. एम. शिंदे, प्रा. डॉ. एस. डी. ठाकरे आदींनी पाठींबा दर्शविला.

आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑगस्ट रोजी उच्च शिक्षण विभागासमोर राज्यातील सर्व प्राध्यापकांना घेत आंदोलन करण्यात येईल. 4 सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल व तरीही आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर रोजी राज्यातील प्राध्यापक लाक्षणिक बंद पुकारतील.
– डॉ. के. एल. गिरमकर, शहरचिटणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटना (स्फुक्‍टो)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)