पुणे: भटक्‍या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी कालबद्ध मोहीम

पुणे – “आला पावसाळा कुत्र्यांच्या चाव्यापासून सांभाळा’ असे म्हणण्याची वेळ भटक्‍या कुत्र्यांची संख्या पाहिल्यानंतर पुणेकरांवर आली आहे. गल्लोगल्ली झुंडीने दिसणाऱ्या या कुत्र्यांचा त्रास रात्री दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर हमखास होतो. नुकतेच कात्रज येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भटक्‍या कुत्र्यांपासून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरणाची कालबद्ध विभागनिहाय मोहीम हाती घेतली आहे.

आठ जूनपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, तीन महिने ती सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील काही वर्षांत शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ही संख्या दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. या कुत्र्यांच्या चाव्यांमुळे अनेक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी हा विषय मुख्यसभेत चर्चिला जातो. त्यामुळे या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक मोहीम आखली आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये “ब्ल्यू क्रॉस’ सोसायटीच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि त्यांना अँटी रेबिज लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे डॉ. साबणे यांनी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये कारवाईसाठी प्रत्येकी दहा दिवसांचे श्‍येड्यूल तयार करून तशी पथके तयार करण्यात आली आहेत. 8 जूनपासून वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्र. 13 आणि 19 जूनपासून नगररोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.5 मध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागातील कारवाईचा कालावधी निश्‍चित करून वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत 544 भटक्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी रेबिजची लस देण्यात आल्याचे डॉ. साबणे यांनी नमूद केले.

कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतर त्याच्या गळ्यात लाल पट्टा अडकवण्यात येणार आहे. ऍन्टी रेबिज लसिचा प्रभाव हा तीन वर्षे राहतो. त्यावर लस दिल्याची तारीख नमूद करण्यात येणार आहे. दर तीन वर्षांनी त्याचा रंग बदलण्यात येणार असल्याचे डॉ. साबणे यांनी नमूद केले. 20 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असून, प्रसंगी या मोहीमेचा कालावधी वाढविण्यात येईल, असेही डॉ. साबणे यांनी स्पष्ट केले.

आजारी कुत्र्यांसाठी संगोपन केंद्र
त्वचारोगाची लागण झालेले अनेक भटके कुत्रे रस्त्याने फिरत असतात. तसेच आजारी असलेल्या कुत्र्यांची संख्याही जास्त आहे. त्यांच्यापासून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ नयेत यासाठी अशा कुत्र्यांच्या संगोपनासाठी केंद्र सुरू करण्याचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मालमत्ता व्यवस्थापान विभागाकडे जागेची मागणीही केली आहे. मुंढवा येथे गोठ्यांसाठी दिलेल्या जागांतील एक जागाही द्यावी अशी मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. हा विषय अतिरिक्त आयुक्तांकडे विचाराधीन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)