पुणे – बोगस ‘पोलीस मित्रा’चा मोफत प्रवासासाठी दबाव

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये आता फुकट्या “ट्रॅफिक वॉर्डन’ची भर पडली आहे. यामुळे पीएमपीला असणाऱ्या डोकेदुखीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकाराबाबत पीएमपी प्रशासनाच्या दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

वाहतूक पोलीस मित्र असल्याचे सांगून अनेक जण पीएमपीच्या बसेसमधून फुकट प्रवास करत असल्याचे पीएमपी प्रशासनाला आढळून आले. याबाबत प्रशासनाने अशा फुकट्यांवर कारवाई करून देखील फरक पडत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. बसच्या वाहकांना “वाहतूक पोलीस मित्र’ असल्याचे ओळखपत्र दाखवून फुकट प्रवास करता यावा यासाठी वाद घालत असल्याचे समोर आले आहे. केवळ वाहतूक पोलीस मित्रच नव्हे तर निवृत्त पोलीस असल्याचे सांगत अनेक जण फुकट प्रवासावर हक्क सांगत असल्याचे पीएमपीने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले. याबाबत पीएमपी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि तिकीट तपासणीच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पीएमपीकडून पोलिसांना कररानुसार मोफत सेवा पुरवली जाते. एक वर्षानंतर याचा मोबदला घेतला जातो. याकराराच्या अटी आणि शर्ती ठरलेल्या असून, प्रवासादरम्यान ओळखपत्र बाळगणे, गणवेश अनिवार्य असणे. या प्रवासची सुविधा केवळ पोलिसांसाठी असून अन्य कोणालाही याचा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर पोलीस मित्रांना मोफत प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक विभागाकडून “वाहतूक पोलीस मित्र’ असे कोणतेही वेगळे ओळखपत्र देण्यात येत नाही. त्यामुळे या व्यक्ती फुकट प्रवास करताना आढळल्यास, पीएमपी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, असे वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)