पुणे – बुधवार पेठेतील तृतीयपंथीयांना मिळणार प्रमाणपत्र

गैरप्रकार रोखण्यासाठी विधि सेवा प्राधिकरणाचा उपक्रम


बोगसगिरी, नागरिकांची लूट रोखण्यासाठी पाऊल


ससून रुग्णालय प्रशासनाशी लवकरच पत्रव्यवहार

पुणे – तृतीयपंथी असल्याचे भासवत गैरप्रकार करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी बुधवार पेठमध्ये वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीयांना संबंधित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने हा उपक्रम हाती घेतला असून पुढील महिन्यांपासून त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे बोगस तृतीयपंथी लगेचच ओळखता येणार आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठमध्ये मोठ्या प्रमाणात तृतीयपंथीय राहत आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या काही व्यक्ती या मुद्दाम आपण तृतीयपंथी असल्याचे भासवून नागरिकांना लुटत आहेत. रात्रीच्या वेळी असे प्रकार सर्रास सुरू असतात. त्यामुळे या प्रकारांना लगाम लागावा आणि खरे तृतीयपंथीय ओळखता यावे, यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी गुरुवारी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची प्रक्रिया काय असेल, हे निश्‍चित झाल्यानंतर आशीर्वाद संस्थेच्या माध्यमातून टप्प्याटप्याने तृतीयपंथीयांना तपासणीसाठी ससूनला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होईल, असे भागवत यांनी सांगितले.

अनेक तृतीयपंथीयांना नोकरी करण्याची इच्छा आहे. प्रमाणपत्रामुळे त्यांना नोकरी मिळणे सोपे होईल. सुरुवातीला केवळ बुधवार पेठमधील तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुढील काळात त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.
– चेतन भागवत, सचिव, पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण

शिबिरात वैद्यकीय तपासणी
बुधवार पेठेत राहत असलेल्या तृतीयपंथीयांसाठी विधि सेवा प्राधिकरण आणि फरासखाना पोलीस स्टेशन यांच्या विद्यमाने वैद्यकीय तपासणी व कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या वेळी ससूनमधील डॉक्‍टर नितीन पनाड, डॉ. आनंद कपाडिया, डॉ. रिचा शर्मा, डॉ. ऋषिकेश नाईक, डॉ. सतीश पोरे, डॉ. समीर तिरथाडे यांनी सुमारे तृतीयपंथीयांची वैद्यकीय तपासणी केली. तर भागवत यांनी तृतीयपंथीयांबाबत प्रचलित कायदे आणि त्यांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस, पोलीस नाईक सचिन कुटे आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)