पुणे: बिटकॉइनप्रकरणी आणखी एक दोषारोपपत्र दाखल

57 जणांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक

पुणे – क्रिप्टोकरन्सी असलेले बिटकॉइन घेऊन त्याबदल्यात “एम-कॅप’ हे बाजारात मूल्य नसलेले आभासी चलन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर गुन्हे शाखेने मुख्य आरोपी अमित भारद्वाजसह 7 आरोपींविरोधात 4 हजार 800 पानी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात बुधवारी दाखल केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर गुन्ह्यात सुमारे 120 जणांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांची एकूण 12 कोटी रुपयांची 1370 बिटकॉईनची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अमित भारद्वाज (रा.दिल्ली), विवेक भारद्वाज (रा.दिल्ली), पंकज अदालखा (रा.दिल्ली), हेमंत भोपे, हेमंत सूर्यवंशी, हेमंत चव्हाण (सर्व रा. पुणे) व अजय जाधव (रा. पुणे) यांच्याविरोधात दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. याप्रकरणी अजून 10 आरोपी फरार असून त्यांची नावे दोषारोपत्रासोबत न्यायालयात देण्यात आली आहे. याबाबत व्यावसायिक भीमसेन बाबुराम अगरवाल यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अगरवाल यांना गेन बिटकॉईन कंपनीत बिटकॉइन गुंतविल्यास मोठ्या मोबदल्याची अमिषे दाखवून, त्यांना बिटकॉइन विकत घेण्यास लावून त्यांची एकूण 1 कोटी रुपयांच्या 93.5 बिटकॉइनची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी संगनमताने कट रचून संबंधित बिटकॉइनची परस्पर विक्री करुन त्याचा ठरल्याप्रमाणे परतावा न देता तसेच गुंतविलेले बिटकॉइन किंवा त्यांची किंमत परत न करता फसवणूक करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच पोलीसांनी अशाचप्रकारे दत्तवाडी पोलीस ठाण्यात निशा रायसोनी (वय-46,रा.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 21 आरोपीं विरोधात 4 हजार पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदर गुन्ह्यात एकूण 57 जणांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)