पुणे – बकेट, बेंचेस खरेदी होणार “नियमात’

महापालिकेकडून नियमावली : नियमानुसारच कार्यवाहीचे आदेश

पुणे – बकेट, बाकडे आणि ज्यूटच्या पिशव्या खरेदीसाठी महापालिका प्रशासनाने नियमावली काढली आहे. ती महापालिकेचे संबंधित विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना पाठवण्यात आली असून, येथून पुढील कार्यवाही याच नियमानुसार करावी असे या आदेश पत्रात म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडून बकेट, बाकडे आणि ज्यूटच्या आणि इतर बॅगज्‌ उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर त्याच्या वाटपाबाबतचा अहवाल संबंधित विभाग अथवा क्षेत्रीय कार्यालयांकडून मध्यवर्ती भांडार कार्यालयाने मागवला असता, परिपूर्ण अहवाल सादर करता येत नसल्याचे वारंवार निदर्शनाला येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

या वस्तूंच्या वाटपाबाबत महापालिका प्रशासनाकडे सभासदांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असून, महापालिकेच्या विविध विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून होणाऱ्या वाटपामध्ये अनियमितता आढळून येत आहे. त्यामुळे अशा तक्रारी येऊ नयेत, यासाठी नियमावलीची कार्यवाही होणे आवश्‍यक असल्याचेही या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

एखाद्या सादर केलेल्या प्रकरणात अनियमितता टाळण्यासाठी मागणीनुसार निविदेमध्ये समाविष्ट सर्व साहित्य, एकावेळी मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडून सर्व संबंधित विभाग अथवा क्षेत्रीय कार्यालयांनी ताब्यात घ्यावे, तसेच त्यांनी या कामी नियुक्त जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडून पुरवला जाणारा माल निविदा स्पेसिफिकेशननुसार तपासून घेऊन प्राप्त मालाची नोंद “डेड स्टॉक रजिस्टर’वर घेणे बंधनकारक राहील. मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडून विविध विभागांना प्राप्त वस्तू त्यांच्याकडून वाटप झाल्यानंतर त्यांनी मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडे सादर करायचे परिशिष्ट “अ’ आणि “ब’चे उपयोगिता प्रमाणपत्र मसुद्याला जोडणे आवश्‍यक आहे.

या वस्तू संबंधित कंत्राटदारांकडून स्विकारताना तसेच त्याचे नागरिकांना वाटप करतानाचे चित्रीकरण अथवा छायाचित्रीकरण करून ते संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने जतन करून मध्यवर्ती भांडार कार्यालयाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. याशिवाय लाभार्थी नागरिकांचे साक्षांकनासह, नाव, मोबाइल क्रमांकाची नोंद घेणे बंधनकारक राहील. वाटप करण्यात येणाऱ्या वस्तू आणि त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने सादर केल्यानंतरच नव्याने पुढच्यावेळी वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

कार्यपद्धतीची कोटेकोर अंमलबजावणीची बंधन
निश्‍चित केलेल्या कार्यपद्धतीची यापुढे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील आणि या प्रकरणी अनियमितता आढळून आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, एस. आय, डीएसआय, कनिष्ठ अभियंता, सहा. महापालिका आयुक्त यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असाही इशारा या आदेशातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)