पुणे पोलिसांची रांची येथे कारवाई
पुणे – पुणे पोलिसांनी झारखंड राज्यातील रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकून हार्डडिस्क, लॅपटॉप, पेनड्राईव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा व काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील कोरेगाव-भीमा याठिकाणी दोन गटांत हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात नक्षलवादी हितसंबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत विचारवंतांना अटक केल्याने खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी हा छापा टाकण्यात आला.
कबीर कला मंच या संघटनेच्या वतीने कोरेगाव-भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियान या नावाने शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनात सुधीर ढवळे व कबीर कला मंचाच्या इतर सदस्यांचा समावेश होता. यावेळी काही आक्षेपार्ह गाणी सादर करण्यात आली होती. तसेच, समाजात तेढ निर्माण करणारे भडकावू व चिथावणीखोर वक्तव्य करून पत्रके, पुस्तिका व भाषणे यांच्या माध्यमातून समाजात शत्रुत्त्व निर्माण करण्यात आले होते.