पुणे : प्लॅस्टिक बंदीसाठी छापेमारी

26 टन प्लॅस्टिक जप्त


साडेचार लाखांचा दंड


डी-मार्ट, कात्रज डेअरीवरही कारवाई

पुणे – राज्यशासनाच्या प्लॅस्टिकबंदी निर्णयानंतर महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई सुरू केली आहे. यात गेल्या दोन आठवड्यात तब्बल 26 हजार 500 किलो ( 26 टन) प्लॅस्टिक महापालिकेने जप्त केले आहे.

महापालिकेने या कारवाई अंतर्गत शुक्रवारी सातारा रस्त्यावरील डी-मार्ट या मॉलवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल अडीच टन प्लॅस्टिक जप्त केले आहे. तर कात्रज डेअरीवरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडील प्लॅस्टिक स्ट्रॉ जप्त केल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.

महापालिकेने शहरातील प्लॅस्टिकवरील कारवाईसाठी क्षेत्रीय कार्यालये तसेच शहर पातळीवर स्वतंत्र पथके नेमली आहेत. या शिवाय, व्यावसायिकांमध्ये जागृतीही केली जात आहे. त्यांच्याकडून प्लॅस्टिक जमा करून घेतले जात आहे. मात्र, त्यानंतरही महापालिकेस प्लॅस्टिक न देता त्याची राजरोसपणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील बाजारपेठांचा समावेश असून या बाजारपेठांमधील व्यावसायिकांकडील थर्माकॉल तसेच प्लॅस्टिकचे साहित्य आणि पिशव्या जप्त केल्या जात असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

डी मार्टचे अडीच टन प्लॅस्टिक सील
महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत शुक्रवारी सातारा रस्त्यावरील डी मार्टवर कारवाई करण्यात आली. यात तब्बल अडीच टन प्लॅस्टिक सील करण्यात आले. सर्व मॉलचालकांना राज्यशासनाच्या निर्णयाची माहिती देण्यात आलेली असून त्यांना प्लॅस्टिक महापालिकेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून त्यास प्रतिसाद दिला जात नसल्याने कारवाई करण्यात येत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. डी मार्ट बरोबचर लक्ष्मी रस्त्यावरील सहेली या दुकानातूनही मोठया प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)