पुणे: प्लॅस्टिक नष्ट करणाऱ्या विषाणूंचा शोध

प्लॅस्टिक हा सर्वसामान्य जीवनातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तो पूर्णपणे वापराबाहेर टाकणे अशक्‍य आहे. या विषाणूच्या शोधातून भविष्यात प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या सोडविण्यात मोलाची मदत होणार असली, तरी त्यासाठी बराच काळ लागणार आहे. त्यामुळे सध्या प्लॅस्टिक वापराबाबत काळजी घेणे जास्त उपयोगाचे ठरेल. – डॉ. अविनाश पोलकडे, मायक्रोबॉयोलोजिस्ट

अमेरीकेतील शास्त्रज्ञांचा दावा : भविष्यात प्लॅस्टिकची नष्ट करण्यात होणार उपयोग

पुणे – प्लॅस्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या पर्यावरण तज्ज्ञांच्या काळजीचा विषय बनला आहे. प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ असल्यामुळे याची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्‍न जगभरातील संशोधकांना, पर्यावरण तज्ज्ञांना पडला आहे. मात्र एका नवीन संशोधनामध्ये प्लॅस्टिक खाणाऱ्या विषाणूंचा शोध लागला असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या याची कार्यक्षमता कमी असली, तरी भविष्यात प्लॅस्टिकची समस्या नष्ट करण्यात याचा उपयोग होणार असल्याचे संशोधनात सांगितले आहे.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे नॅशनल रेन्युएबल एनर्जी लॅबोरेटरी (एनआरईएल) आणि युनायटेड किंगडमच्या पोर्टसमाऊथ विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनातून या विषाणूचा शोध लागला आहे, असे सांगितले जात आहे. पॉलिथिलीन तेरेपॅथलेटपासून(पेट) बनविण्यात आलेल्या प्लॅस्टिक बॉटल खाऊ शकणारा हा विषाणू हा प्लॅस्टिक समसेवरील एक चांगला उपाय ठरेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी एनआरईएलचे ब्रॅयन डोनोहोए आणि निक रॉरर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन चालू आहे. या विषाणूचे शास्त्रीय नाव “इडिओनेला साकाइसिस 201-एफ67′ असे असून त्याचा शोध एका वर्षापूर्वी जपानी पेट बॉटल पूनर्वापर प्रकल्पातील मातीत लागला आहे. विविध प्रयोगांच्या माध्यमातून हे विषाणू प्लॅस्टिक खात असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, याची क्षमता कमी असून, ती वाढविण्यासाठी विविध प्रयोग चालू असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

एका बातमीनुसार, जगातील महासागरांमध्ये दरवर्षी आठ लाख टन कचरा टाकला जातो. यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लॅस्टिकचे आहे. हा कचरा इतका प्रचंड आहे. की त्यातून एक मोठे बेट तयार होईल. या कचऱ्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होत आहे. हे कळाल्यावर शास्त्रज्ञांना प्लॅस्टिकची समस्या गंभीर असून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे, याची जाणीव झाली. त्याच अनुषंगाने संशोधन करताना अचानक या विषाणूचा शोध लागला. वर्षभर विविध प्रयोगांच्या माध्यमातून या विषाणूची रचना, कार्यपद्धत, क्षमता याचा अभ्यास करण्यात आला. भविष्यात विषाणूची कार्यक्षमता वाढवून त्याचा व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करता येईल, याचा अभ्यास सध्या चालू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)