पुणे – प्रबोधिनीत पहिल्या ‘व्हाइट पेट्रोल’ बॅचची उपस्थिती

एनडीएच्या 136 व्या पदवीप्रदान सोहळ्यास माजी सैनिकांनी उपस्थिती

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत उन्हाळी दीक्षांत संचलनासाठी “व्हाइट पेट्रोल’ या गणवेशाचा वापर होतो. हा गणवेश परिधान करण्याची सुरुवात सुमारे 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1969 साली झाली होती. यंदा या गणवेशाचा समावेशाला तब्बल 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने 50 वर्षांपूर्वी प्रथमच “व्हाइट पेट्रोल’ हा गणवेश परिधान करत प्रबोधिनीतून पासआऊट झालेल्या तुकडीतील काही माजी सैनिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

प्रबोधिनीच्या 136 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा गुरुवारी पार पडला. उन्हाळी दीक्षांत संचलनासाठी “व्हाइट पेट्रोल’ हा गणवेश बंधनकारक असतो. त्यानुसार या गणवेशात विद्यार्थ्यांनी संचलन केले. मात्र, प्रबोधिनीत ही परंपरा 1969 साली सुरू झाली होती. त्यावर्षी प्रथमच या गणवेश परिधान करून प्रबोधिनीतून बाहेर पडणाऱ्या तुकडीतील काही माजी विद्यार्थी आज संचलन पाहण्यासाठी उपस्थित होते. यामध्ये मेजर जनरल टी.पी.सिंग, ब्रिगेडियर एस.के. स्माइल, ब्रिगेडियर अजित आपटे, कर्नल सुधीर फड, कर्नल पी.डी.शिरनामे, कर्नल अशोक पुरंदरे, कर्नल भगतसिंह देशमुख यांचा समावेश आहे. प्रबोधिनीचा सर्वोच्च सन्मान असणारी संचलनाची अनुभूती हा नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव असतो. परंतु तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या बॅचमेट सोबत हा सोहळा अनुभवताना एक विलक्षण अनुभूती होत असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली.

याबाबत कर्नल सुधीर फड म्हणाले, प्रबोधिनीतून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतानाचा क्षण हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. या 50 वर्षांच्या काळात प्रबोधिनीत अनेक बदल झाले आहेत. विशेषत: तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रबोधिनीने अतिशय चांगले बदल आत्मसात केले आहेत. मात्र, हे बदल स्वीकारत असतानाही प्रबोधिनीची मूळ परंपरा आणि प्राचीन वारसा अगदी जशास तसा जपला आहे. याचे खरोखरच अभिमान वाटते. त्यामुळेच ही संस्था लष्करी प्रशिक्षणातील सर्वोत्तम संस्था आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)