पुणे – प्रचाराचा नारळ कॉंग्रेसभवनातच फुटणार

प्रचार नियोजनासाठी आज पहिली संयुक्त बैठक

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवार निश्‍चित होण्यास होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन कॉंग्रेसकडून प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली आहे. दरम्यान, उमेदवार जाहीर होताच, पक्षाकडून प्रचाराला सुरुवात केली जाणार असून प्रचाराचा नारळ कॉंग्रेस भवनातच फोडला जाणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाकडून पुण्यासाठीच्या उमेदवाराची घोषणा करण्यासह मंगळवारपासून प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कॉंग्रेस उमेदवाराच्या शोधातच आहे. शेवटच्या टप्प्यात माजी आमदार तसेच मोहन जोशी यांच्यासह अरविंद शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, अद्यापही पक्षश्रेष्ठींना त्याबाबत निर्णय घेणे शक्‍य होत नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, राज्याकडून उमेदवारांची नावे पाठविताना, प्रत्येकवेळी वेगळ्या उमेदवाराचे नाव पाठविण्यात आल्याने पक्षश्रेष्ठीही राज्याकडून आलेल्या नावातील कोणत्या एका नावाची शिफारस स्विकारायची याबाबत संभ्रमात आहेत. त्यामुळे उमेदवार निवडण्यात अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यामुळे कार्यकर्तेही वैतागले आहेत.

एका बाजूला भाजपचा प्रचार सुरू झाला असतानाच आपण प्रचार कधी सुरू करायचा याबाबत कार्यकर्ते वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसकडून प्रचाराची तयारी पूर्ण करण्यासाठी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी कॉंग्रेसभवनमध्ये बोलाविली आहे. यात प्रचाराचे अंतिम नियोजन करण्यासह प्रचाराचा नारळ केव्हा फोडायचा आणि त्यासाठी कोणकोणते नेते उपस्थित राहणार याचे नियोजन सुरू केले आहे. तर प्रचाराची पहिली सभा कॉंग्रेस भवनातच होणार असून त्यासाठी आवश्‍यक असलेल्या मान्यतांसह सर्व तयारी पक्षाने पूर्ण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)