पुणे पेशवाजचा हैदराबाद स्काय संघावर विजय

यूबीए प्रो बास्केटबॉल लीग स्पर्धा
चेन्नई, दि. 16 – पुणे पेशवाज संघाने शानदार कामगिरी करताना युनायटेड बास्केटबॉल अलायन्स (यूबीए) प्रो बास्केटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. हैदराबाद स्काय यांच्यातील पहिल्या सामन्यात पुणे पेशवाजने हैदराबाद स्काय संघावर 114-103 असा विजय मिळवला.
चेन्नईच्या सत्यभामा युनिवर्सिटी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हैदराबाद स्काय संघाने अमेरिकेच्या टेविन केली आणि बोस्नियाचा मॅक बोसकाईलो यांचा संघात समावेश केला. मॅक हा लॉस अँजेलिस ड्रे लीगमध्ये खेळला आहे. दुसरीकडे पहिल्याच सामन्यात पुणे पेशवाज संघाला प्रमुख तीन खेळाडूंशिवाय खेळावे लागले. यामध्ये सिद्धांत शिंदे व अजिंक्‍य माने यांच्यासोबत प्रदीप चव्हान या खेळाडूंचा समावेश होता. चव्हाण हा दुसऱ्या स्पर्धेत खेळत असल्याने हा सामना खेळू शकला नाही. या सामन्यात ऍरीझोना स्टेट विद्यापीठाचा खेळाडू पिएरी न्यूटन सहभागी झाला असून भारताचा कर्णधार अमृतपाल सिंह याने देखील यूबीएमध्ये पदार्पण केले.
हैदराबाद स्काय संघाने महेश पद्मनाभन, टेविन केली, मॅक बोसकाईलो, जोगिंदर सिंह, मनू थॉमस यांच्यासह सुरुवात केली. पुण्याकडून पिएरी न्यूटन, अमृतपाल सिंह, अजिंक्‍य मेहता, नरेंदर ग्रेवाल आणि अशप्रीत भुल्लर यांनी प्रतिस्पर्धी संघाला आव्हान दिले. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला मॅक व अमृतपाल यांनी आक्रमक खेळ करत आपापल्या संघांसाठी निर्णायक कामगिरी केली.पुण्याच्या संघातील खेळाडूंनी पहिल्या सत्रात दहा मिनिटांच्या खेळामध्ये आपली चमक दाखवली. तसेच पहिल्या सत्राच्या शेवटी पुणे पेशवाज संघाने 29-19 अशी आघाडी घेतली.
दरम्यान दुसऱ्या सत्रात हैदराबाद स्काय संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुरुवातीला हैदराबाद स्कायने पुणे पेशवाजवर आघाडी घेतली. परंतु पुण्याच्या संघाने आपला खेळ उंचावत मध्यंतरापर्यंत 57-55 अशी दोन गुणांची आघाडी राखली. तिसऱ्या सत्रात हैदराबाद संघाकडून महेशने सलग बास्केट नोंदवत गुणांची कमाई केली. परंतु तिसऱ्या सत्राच्या अखेरीस पुण्याने 91-87 अशी आघाडी घेतली. मॅकला फाऊल केल्याने बराच काळ बाहेर बसावे लागले. मात्र महेश व केलीने हैदराबादसाठी चांगला खेळ केला.
सामन्याच्या चौथ्या आणि निर्णायक सत्रात दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. पुण्याने गुणांची कमाई करण्याची संधी गमावली. दुसरीकडे केलीने हैदराबाद संघासाठी गुणांची कमाई करत सामन्यातील चुरस कायम ठेवली. मात्र पुणे संघाने निर्णायक क्षणी खेळ उंचावत सामना 114-103 असा जिंकला.
सविस्तर निकाल
पुणे पेशवाज – 114 (अमृतपाल सिंह 31, पिएरी न्यूटन 31, नरेंदर ग्रेवल 15) वि.वि. हैदराबाद स्काय – 103 (टेविन केली 25, महेश पद्मनाभन 22, मॅक बोसकाईलो). सर्वोत्तम खेळाडू – न्युटन पिएरी व अमृतपाल सिंह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)