पुणे – पेपरफुटीप्रकरणाचा अहवाल लांबणीवर

सिनेट 30 मार्च रोजी : आज व्यवस्थापन परिषद बैठक

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विषयाच्या पेपर फुटीसंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीद्वारे मंगळवारी (दि.19) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आपला अहवाल मांडला जाणार होता. मात्र चौकशी अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे समितीने चौकशीसाठी आणखी वेळ मागवून घेतला आहे. परिणामी, उद्याच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विधी पेपरफुटीवर ठोस निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

विधि विषयाच्या पेपरफुटीवरून विद्यापीठावर पुन्हा परीक्षा घेण्याची नामुष्की आली होती. पेपरफुटीवर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करीत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर दि. 1 मार्च रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठाने पेपरफुटी संदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची चौकशी समिती गठित केली. राजेश पांडे यांच्या अध्यक्षखालील समितीत डॉ. संजय चाकणे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. महेश आबाळे यांचा समावेश आहे. ही समिती या प्रकरणाची जबाबदारी निश्‍चित करेल आणि आवश्‍यक कारवाईच्या शिफारशींसह लवकरच आपला अहवाल सादर करेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.

दरम्यान, समितीने परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. त्यानंतर आणखी काही व्यक्‍तींची चौकशी करावयाची आहे. त्यासाठी समितीला आणखी कालावधी लागेल. या सर्व घटकांची चौकशी करून सर्वसमावेशक अहवाल कुलगुरूंना येत्या चार-पाच दिवसांत सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, समितीला आणखी कालावधी लागत असला तरी याप्रकरणी परीक्षा विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.

सिनेटमध्ये होणार चर्चा
विद्यापीठाची अधिसभा अर्थात सिनेट येत्या 30 मार्च रोजी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या बैठकीत सिनेटच्या प्रश्‍नोत्तरावर चर्चा होणार असल्याची चिन्हे आहेत. या सिनेटमध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)